२,१०,००० रूपये किंमतीच्या ६ मोटारसायकल हस्तगत
कोल्हापूर |यश रूकडीकर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ५ अट्टल मोटारसायकल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत.त्यांच्याकडून २,१०,००० रुपये किंमतीच्या ६ स्प्लेंडर मोटारसायकल पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनांनुसार चोरीला गेलेल्या मोटारसायकल्सचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक घेत होते.गुन्ह्यांचा समांतर तपास चालू असताना पथकातील पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील व विशाल खराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की बुधवार (दि.२८ रोजी ) शाहू टोल नाका या ठिकाणी काही इसम मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत.
पोलीसांनी याठिकाणी सापळा रचला असता तीन इसम विनानंबरप्लेटच्या २ मोटारसायकल घेऊन कागलच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.त्यांना थांबवून त्यांची नावे व पत्ता विचारला असता त्यांनी नावे १)ओंकार जालिंदर सिद, वय २०,२)ऋतुराज दमनाथ हेगडे,वय २१ वर्ष राहणार बेगर वसाहत,कागल असे सांगितले.त्यांच्यासोबत गुन्ह्यातील त्यांच्या ३ अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.सदर मोटारसायकलींचे चेसिस नंबर व इंजिन नंबरच्या आधाराने माहिती घेतली असता ह्या मोटारसायकल कागल पोलीस ठाणे व गांधीनगर पोलीस ठाणेच्या हद्दीतून चोरल्या गेल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरी केलेल्या आणखी ४ मोटारसायकल असल्याचे त्यांनी कबूल केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील,विशाल खराडे,वैभव पाटील,संतोष बरगे,परशुराम गुजरे,अशोक पोवार,राजू कांबळे यांनी केली.