देश विरोधी घोषणाबाजी प्रकरण; जिल्ह्यातील अन्य अनधिकृत गाड्यांची तपासणी होणार
मालवण : देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकांचे जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्याचा ठाम निर्धार आमदार निलेश राणे यांनी केला आहे. या भंगार व्यवसायिकांकडे अनधिकृत गाड्या वापरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार राणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवणात भंगार विक्रेत्यांच्या डेपोमध्ये जाऊन तपासणी केली. यात एका कंपनीचे वाहन अनधिकृतपणे वापरात असल्याचे निदर्शनास आल्याने ही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी मालवण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून यानंतरच्या काळात देखील भंगार विक्रेत्यांकडे जिल्ह्यात अनधिकृतपणे वापरात असलेल्या गाड्यांची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हा परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान जिहादी प्रवृत्तीच्या देशविघातक प्रवृत्तींचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करणार असल्याचा इशारा निलेश राणेंनी दिला आहे. शहरातील वायरी आडवण परिसरात मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेने जिल्ह्यात एकच संतापाची लाट निर्माण झाली आहे. आमदार निलेश राणे यांनी या घटनेनंतर आक्रमक होत प्रशासनामार्फत येथील भंगार विक्रेत्यांच्या वस्तीवर बुलडोझर फिरवला. या कारवाईचे हिंदुत्ववादी नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर या पाकिस्तान धाजीर्ण्या प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यासाठी आज आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मालवणात भंगार विक्रेत्यांच्या वाहनांची तपासणी केली. यावेळी एम. एच. ०७ एजे- ३५८९ ही गाडी अनधिकृतरित्या वापरात असल्याचे निदर्शनास आले असून ही गाडी आरटीओ मार्फत ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. याठिकाणी आज अन्य दुचाकी वगैरे वाहने मिळून आलेली नाहीत. मात्र आरटीओ मार्फत यानंतर देखील तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. या पथकात मोटर वाहन निरीक्षक संदीप भोसले, केतन पाटील, प्रीतम पवार आदी अधिकारी सहभागी झाले होते.