अधीक्षक अभिनेत्यांचे सकारात्मक धोरण; अशोक सावंत यांची यशस्वी मध्यस्थी
कुडाळ : महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता न केल्यास कामावरून कमी करण्याचा लेटरबॉम्ब ठेकेदाराने कर्मचाऱ्यांवर टाकला होता. या प्रश्नी कामगार नेते अशोक सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची भेट घेत एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढू देणार नाही असा इशारा दिला. अखेर अधीक्षक अभियंता यांनी एकाही कर्मचाऱ्याला काढणार नाही असा शब्द देत कागपत्रांची पूर्तता करण्यास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल असा शब्द दिल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महावितरणचे शेकडो कंत्राटी कर्मचारी गेलो अनेक वर्षे काम करत आहेत. मात्र अचानक या कर्मचाऱ्यांना काही कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 ही शेवटची डेडलाईन देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची भेट घेत याची माहिती दिली. कामावरून काढू नये असे महावितरणला सांगण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आज कामगार नेते अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे ४०० ते ४५० कामगार हे आज महावितरण कंपनीमध्ये रिक्त पदाच्या अनुषंगाने वर्षानुवर्षे प्रामाणिक पणे कंत्राटी पद्धतीवर तांत्रिक कायम कामगारांचे काम करीत आहेत. वारा कींवा पाऊस असुदेत आपल्या जीवाची तमा न बाळगता हे कंत्राटी तांत्रिक कामगार जनतेची सेवाच आपल्या तुटपुंज्या पगारातून करीत आहेत. तसेच वीज उद्द्योग हा अतिशय धोकादायक उद्योग म्हणून गणला जातो. कंत्राटी तांत्रिक कामगारांना कमी करण्याचे परीपत्रक आपल्या कार्यालयातून ठेकेदार याच्याकडे गेलेले असुन कुडाळ व कणकवली विभागातील तांत्रिक कंत्राटी कामगार हे घाबरले आहेत. त्यामुळे यातील एकही कर्मचाऱ्याला कमी करू देणार नाही असा इशारा अशोक सावंत यांनी अधीक्षक अभियंता यांना दिला. काही अपूर्ण कागदपत्रे आहेत ती आम्ही पूर्ण करून देऊ पण कर्मचाऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांनी एकाही कर्मचाऱ्याला काढून टाकले जाणार नाही. कर्मचाऱ्यांची जी काही अपुरी कागदपत्रे आहेत त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ती पूर्ण करून घेण्यात येतील. त्यासाठी आवश्यक फॉर्म भरण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येणाऱ्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शब्द अधीक्षक अभियंता साळुंखे यांनी कामगार नेते अशोक सावंत आणि कर्मचाऱ्यांना दिला. त्यामुळे गेले अनेक दिवस आपली नोकरी जाईल या भीतीने घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.