कणकवली : कणकवली बस स्थानकासमोरील लक्ष्मी लॉजमध्ये बांगलादेशी महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव व मॅनेजर ओंकार भावे या दोघांना जिल्हा सत्र व प्रधान न्यायाधीश हनुमंत गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ऍड. विरेश नाईक यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यांना ऍड. सिद्धेश शेट्ये व ऍड. देवेश देसाई यांनी सहकार्य केले. १५ जानेवारी ला पहाटे ४ वाजता दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने रेल्वे स्टेशन येथे पकडून त्यांना कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तपासी अधिकारी पीएसआय अनिल हडळ यांना गुन्ह्याच्या तपासात बांगलादेशी महिलांना लक्ष्मी लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी लॉज मालक संजय सांडव आणि मॅनेजर ओंकार भावे यांनीच आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार संजय सांडव आणि ओंकार भावे यांच्यावर तपासी अधिकरी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती.
मॅनेजर ओंकार भावे व संजय सांडव यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान प्रकृती अस्वस्थ असल्याने संजय सांडव याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यापासून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही आरोपींनी जामीन मंजूर होण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर १ फेब्रुवारी २०२५ ला सुजवणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी जामीन अर्जाला आक्षेप घेत दोन्ही आरोपींची गंभीर गुन्हा केला आहे. बांगलादेशी महिलांकडून आरोपींची लक्ष्मी लॉजवर वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी महिलांच्या संपर्कात आरोपी कसे आले याचा तपास होणे, आरोपींच्या मोबाईल सिडीआर वरून सखोल तपास करणे, आरोपीना जामीन मिळाल्यास अधिक मिळणारे पुरावे नष्ट होण्याची व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करत आरोपींचा जामीन फेटाळण्यासाठी युक्तिवाद केला. आरोपींचे वकील ऍड विरेश नाईक यांनी मुळातच भारतीय न्याय संहिता कलम १४३ चे ३ हे वाढीव कलम चुकीचे आहे. कारण बांगलादेशी महिलांना कणकवली पर्यंत आणण्यात कुठेही सांडव अथवा भावे यांचे प्रयत्न नाहीत. त्या महिलांना डांबून ठेवून धाक दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे नमूद नाही. लावण्यात आले कलम १४३ चे ३ हे कलम गैर लागू आहे. दोन्ही बांगलादेशी महिला ह्याच आरोपी आहेत. आणि आरोपी महिलांच्या स्टेटमेंटनुसार सांडव आणि भावे यांच्यावर गुन्हा दाखल केला हे आक्षेपार्ह आहे. दोन्ही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा सबळ पुरावा नाही, आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले. ऍड विरेश नाईक यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी संजय सांडव आणि ओंकार भावे यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.