मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणं आम्ही गाळ काढण्यासाठी निवडली आहेत. त्यातील हे पहिले जाणवली नदी ठिकाण आहे. येणाऱ्या १५ मे पर्यंत चार टप्प्यात गाळ काढण्यात येईल. तसेच येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कुडाळसह अन्य महत्वाच्या भागातील गाळ काढण्याचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल, जेणेकरून येणाऱ्या काळात पूरपरिस्थिती निर्माणच होणार नाही, हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम सुरू केला आहे.
कणकवली तालुक्यातील वरवडे येथे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिलामोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, माहिती अधिकारी श्री. चिलवंत यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, सोनू सावंत, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस पप्पू पुजारे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले, परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपी संदर्भात मी बोललो होतो. वारिस पठाण हे जे काही बोलतायत ते सर्व गौण आहे. मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यांनी काल स्टेटमेंट देखील दिले आहे की, कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची तयारी असून तशी आमची मानसिकता सुद्धा आहे. हा माझा, आमच्या शिक्षण मंत्री आणि सरकारचा विषय आहे. उगाच अशा हवशे-गवशे- नवशे यांच्या टिकांना कशाला उत्तर द्यायचं.
दादा भुसे यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो
माझा मूळ उद्देश होता की परिक्षांमध्ये कुठेही कॉपी न होता पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे. जो नियम एका धर्माला लागतो तो नियम अन्य धर्मांना लागला पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका होती. त्यानुसार शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असेल. अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्ह आहे. आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. दादा भुसे हे सुद्धा बंदर खात्याचे मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी जर मला काही सूचना केल्या तर मी निश्चित त्या गोष्टीचा विचार करणार आहे. शिक्षण आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून मी वक्तव्य केले. त्यामुळे दादा भुसे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो.