रत्नागिरी – सिंधुदुर्गात खर्च न करणारा खासदार नको
सावंतवाडी : दुसऱ्यांच्या पक्षात लुडबुड करण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळते याची काळजी करा, महाराष्ट्रात महायुती आहे. त्यामुळे विधानसभेत आम्ही काय करणार याची काळजी करू नये तसेच हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून विधानसभेसाठी ठाकरे सेनेचा दावा सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारेंना पाठिंबा जाहीर करून दाखवा, असा इशारा चराठा उपसरपंच अमित परब यांनी रुपेश राऊळ यांना दिला आहे. काल शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर व महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेला श्री. परब यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रत्त्युत्तर दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात महायुती आहे. त्यामुळे विधानसभेत आम्ही काय करणार याची काळजी तुम्ही करू नये. जर महाविकास आघाडीबद्दल तुम्ही आशावादी असाल तर येणाऱ्या विधानसभेसाठी ठाकरे सेनेचा दावा सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारेंना पाठिंबा जाहीर करून दाखवा. तसेच रत्नागिरी- सिंधुदुर्ग आपला निधी खर्च न करणारा खासदार आता नको आहे. विनायक राऊत हे गेल्या १० वर्षात एकही रोजगार आणू शकले नाहीत. त्यांनी फक्त गाव दौरे केले. मात्र कोणतेही प्रश्न मार्गी लावले नाहीत. तसेच हिम्मत असेल तर सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये दिलेला विकास निधीचा हिशोब द्या, असे ही ते म्हणाले.