देवगड | प्रतिनिधी : कराराने दिलेल्या बागेत कुंपण करण्याचा कारणावरून भांडण करून रात्री घरी जाऊन लाकडी दांड्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम (५४) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य विकास कदम व विकास चंद्रकांत कदम या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ मार्च रोजी रात्री ११.३० वा.सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम यांनी तेथिलच विकास चंद्रकांत कदम यांचे भाऊ दत्तात्रय कदम यांची बाग तीन वर्षाच्या करारावर घेतली होती. त्या बागेत कुंपण करायचे होते या कारणावरून झालेल्या भांडणातुन २२ मार्च रोजी रात्री ११.३० वा.सुमारास यशवंत कदम हे आपल्या घरात झोपलेले असताना आदित्य विकास कदम (२२) व विकास चंद्रकांत कदम (५४) या पितापुत्रांनी त्यांचा घरात येऊन मारहाण व शिवीगाळ केली. या घटनेमध्ये आदित्य यांनी यशवंत कदम यांच्या डाव्या पायावर लाकडी दांड्याने मारहाण केली तर विकास कदम यांनी शिवीगाळ करून तू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. याबाबत यशवंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य कदम व त्याचे वडील विकास कदम यांच्याविरूध्द भादवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ.आशिष कदम करीत आहेत.