कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ ते ५ वा. च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे आणि कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र मृत व्यक्तीची सांयकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ ते ५.३० वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष शिवगण व अमित खाडये तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे प्रवीण मोरे घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटण्यासारखे कोणतेही कागद मृतदेहाकडे सापडले नाहीत. परंतु मृत तरुणाच्या अंगावर चौकट असलेले पिवळसर शर्ट, काळी पॅन्ट असे कपडे दिसून आले. तर मृत झालेली व्यक्ती ही साधारणपणे ५ फूट ४ इंच एवढ्या उंचीची आहे.
सदरच्या व्यक्तीला जनशताब्दी एक्सप्रेसने धडक दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु मृत व्यक्तीच्या शरीरावरील जखमा पहिल्या असता रेल्वेची धडक बसली की त्या तरुणाने आत्महत्या केली असावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घटनेत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या डोक्याच्या मागील बाजूस, उजव्या बाजूने कंबरेच्या खाली तसेच उजवा पाय तुटलेल्या अवस्थेत होता. शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. या घटनेची नोंद करण्याचे काम कणकवली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.