सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग होत असेल तर या अनधिकृत मायनिंगला माझा विरोध राहील, हे बंद न झाल्यास जन आंदोलन उभारु असा इशारा दिला. तर स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींंना धमक्या दिल्या जात असून जिल्ह्यात वाल्मिक कराड तयार व्हायला नको असे मत व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, या मागे कोण आहेत ? कोणाचा वरदहस्त आहे हे शोधण गरजेचे आहे. १६ लाख टन बेकायदेशीर मायनिंग उत्खनन येथून परदेशात निर्यात होणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, डंपर व्यवसायिक यांचाही याला विरोध आहे. अधिकृत मायनिंगला माझा विरोध नाही. मात्र, दुसऱ्या लीजच्या नावावर होणार बेकायदेशीर उत्खनन खपवून घेणार नाही असा इशारा श्री. पारकर यांनी दिला. तसेच याबाबत आजच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मायनिंग विरोधात ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याला विरोध करणाऱ्या सरपंच, ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींना दिली जात आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याची दखल वेळीच सर्व संबंधितांनी घ्यावी, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होऊ नये. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाल्मिक कराड निर्माण होऊ शकतो. सिंधुदुर्गत बीड पॅटर्न आम्ही खपवून देणार नाही असं मत श्री. पारकर यांनी व्यक्त केले. यावेळी अवधूत मालवणकर, निशांत तोरसकर, रामा सावंत आदी उपस्थित होते.