कणकवली | मयुर ठाकूर : गोपुरी आश्रमच्या माध्यमातून पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या ‘जीवन मूल्य शिक्षण शाळा’ या उपक्रमास कणकवली व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुलांसाठी हस्तकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रशिक्षिका अस्मिता परब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व स्वावलंबन शिकवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच मुलांना विविध प्रकारची कागदाची फुले व पुष्पगुच्छ तयार करण्यास शिकवले. अस्मिता परब या निवृत्त शिक्षिका असून त्या आता शिक्षकांना हस्तकले विषयी प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करत आहेत. तसेच दुसरे प्रशिक्षक कलाशिक्षक आनंद मेस्त्री यांनी ही मुलांना कागदांपासून विविध वस्तू बनविण्यास शिकविल्या. मोकळ्या वातावरणात शिकविल्यामुळे मुलांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले कौशल्य दाखवून वस्तू तयार केल्याचे प्रशिक्षक आनंद मेस्त्री यांनी सांगितले व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, डॉ. रश्मी पेंडुरकर, वसुधा माने, गोपुरीच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री, विनायक सापळे, प्रियांका मेस्त्री, नताशा हिंदळेकर व पालक उपस्थित होते. संदीप सावंत यांनी या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन केले व उपस्थित विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे आभार मानले.