कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या पुढाकारातून मनोरुग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आता विशेष मोहिम राबविली जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्ते, पर्यटन स्थळी, एस. टी. बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी अनेक मनोरुग्ण व्यक्ती फिरताना दिसून येतात. त्यांच्याकडून महिला, बालके किंवा इतर नागरीकांच्या सुरक्षिततेस, मालमत्तेस धोका निर्माण होवू शकतो. तसेच मनोरुग्ण व्यक्ती रात्री अपरात्री रस्त्यावर फिरत असताना अपघात होवून अपघातग्रस्त व्यक्तींची ओळख पटविणे पोलीसांसमोर मोठे आव्हान असते. याशिवाय, मनोरुग्ण व्यक्तीकडून धार्मिक स्थळे इत्यादींची विटंबणा होवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली अशा मनोरुग्ण व्यक्तींचे पुनर्वसन होवून त्यांची कुटुंबियांसमवेत भेट घडवून आणणे या प्रमुख उद्देशाने मनोरुग्ण व्यक्तींना सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून कायदेशीर प्रक्रिया राबवून शासकीय मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे.
त्यामुळे मनोरुग्ण व्यक्ती आपल्या परिसरात दिसून आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ नजिकच्या पोलिस ठाण्यात नागरीकांनी द्यावी.असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे.