कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कंत्राटी कामगारांची सन्मान परिषद रविवार ५ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत वागदे गोपुरी आश्रम येथे होणार आहे.
या सन्मान परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट हे उपस्थित राहणार आहेत. राज्य घटनेने दिलेली सन्मानपूर्वक जीवनाची शाश्वती कामगारांसाठी तयार करा, अशी या परिषदेची मुख्य मागणी असणार आहे. या परिषदेपूर्वी कणकवली शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नगरपालिका कंत्राटी कामगार सन्मान रैली काढणार आहेत.
सरकार नगरपालिकांना निधी देते ते कायदे मोडावे या हेतूने देत नाही हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत कामगारांचे कायदेशीर हक्क न दिल्यामुळे नगर पालिकांच्या पैशाचा अपहार होतो का, असा आमचा प्रश्न असून तो थांबवला पाहिजे, असेही संघटनेच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, सर्व श्रमिक संघ व कास्ट्राइब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेतली जाणार आहे.