सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पर्यटकांची मोठीग र्दी झाली आहे. देशी-विदेशी पर्यटकांच्या आगमनाने जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. मालवण, देवगड व वेंगुर्ले तालुक्यातील सर्व समुद्र किनारे तसेच श्री क्षेत्र कुणकेश्वर, आंबोली आदी ठिकाणीही पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात एक लाखापेक्षा अधिक पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याची नोंद आहे. तारकर्ली, देवबाग किनारी बोटिंगचा, स्नॉर्कलिंग आदी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे. पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच विविध बिच यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे. शिरोडा, वेळागर, सागरेश्वर, निवती, भोगवे, मोचेमांड, विजयदुर्ग यासारख्या पर्यटन स्थळांनाही पर्यटकांची मोठी पंसती दिली. कुडाळ लायन्स क्लब, देवगड तालुका व्यापारी संघ अशा सामाजिक संस्थानीही पर्यटन महोत्सव आयोजित करत पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये व प्रमूख मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे जिल्हाभरातील हॉटेल्स, पर्यटक निवास हाऊस फुल्ल झाले.