कनेडी बाजारपेठेतील घटना ; चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
कणकवली : कणकवली पोलिस असल्याची बतावणी करत कनेडी बाजारपेठ येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅमची सोन्याची चेन लंपास करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे. तिला कागदातून खडी बांधून देत त्या महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनमेरी सालू डिसिलव्हा (७०, रा. सांगवे, खलांतर-बांधवाडी) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अनमेरी सालू डिसिलव्हा या मुंबई येथे मुलासोबत राहतात. त्या १ डिसेंबर रोजी सांगवे, खलांतर येथील आपल्या घरी आल्या होत्या.
शुक्रवारी अनमेरी डिसिलव्हा या सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कनेडी बाजारपेठेत किराणा सामान आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान अनमेरी यांना कनेडी मच्छी मार्केटसमोर असलेल्या भोगटे वडापाव स्टॉल जवळ उभे असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जवळ बोलावले. त्यामुळे त्या तिथे गेल्या असता त्यांना त्यांनी आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. तसेच सध्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका. तुमच्या गळ्यातील चेन काढून आमच्याकडे द्या. आम्ही तुम्हाला ती कागदाच्या पुडीत बांधून देतो, घरी गेल्यावर गळ्यात घाला, असे सांगितले. त्यामुळे अनमेरी डिसिल्व्हा यांनी ७३ हजार रुपये किमतीची आपली १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्या दोघांपैकी एकाजवळ दिली. त्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने अनमेरी यांच्या हातात एक पांढऱ्या कागदाची पुडी दिली. त्यानंतर त्या तिथून घरी आल्या. तसेच त्या दोन अज्ञात व्यक्तीही दुचाकीवरून निघून गेल्या. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अनमेरी यांनी ती कागदाची पुडी उघडून बघितली. त्यावेळी त्यांना सोन्याच्या चेन ऐवजी त्यात बारीक खडी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या घटनेची माहिती त्यांनी आपल्या शेजारच्यांना दिली. तसेच तत्काळ कणकवली पोलिस ठाण्यातही ही माहिती दिली.
कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, हवालदार मिलिंद देसाई, पांडुरंग पांढरे, दत्ताराम सावंत यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पंचनामा केला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. अधिक तपास पोलिस हवालदार मिलिंद देसाई करत आहेत.
अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे कनेडी परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी कनेडीपासून जवळच असलेल्या हरकुळ बुद्रुक येथे एका महिलेच्या घरात घुसून अज्ञातांनी सोन्याची माळ लंपास केली होती. त्या चोरट्यांचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा ही घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.