कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधी समाज सुधारणा आणि त्यानंतरच राजकीय सुधारणा याला महत्त्व दिले. मात्र, आपल्या देशात समाज सुधारणेला प्राधान्य न देता सत्तेवर येण्याच्या चढाओढीत राजकारणाला प्राधान्य दिले गेले. यातूनच बहुजनांचा मेंदू ताब्यात घेण्यात आला. यापुढे मात्र बहुजनांनी आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवला नाही तर देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंधेला कणकवली तालुका बौद्ध विकास संघातर्फे येथील बौद्ध विहाराच्या सभागृहात कवी कांडर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजचा काळ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. सतीश पवार, कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखाध्यक्ष अंकुश कदम, मुंबई अध्यक्ष अनिल कदम, वसंत कदम, संजय कदम, सुनील तांबे, सुप्रिया सर्पे, विश्वनाथ कदम, स्वप्नील भरणकर, सायली कासले, नीलम तांबे, शैलेश तांबे, संदीप कदम आदी उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले, बाबासाहेबांना समजून घ्यायचे असेल तर आधी त्यांच्या विरोधकांना समजून घ्यायला हवे. तरच बाबासाहेब कळणे शक्य आहे. बाबासाहेबांनी तू गुलाम आहेस याची जाणीव आधी गुलामाला करून द्या, असे सांगितले. कारण ती जाणीव जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत त्याच्यासह जातीच्या उतरंडीवरील शोषितांची सामाजिक सुधारणा होणार नाही. बाबासाहेब किती द्रष्टे होते हे आता लक्षात येते. कारण गेल्या काही वर्षांत गुलामाला अधिक गुलाम बनविण्याची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. काही जातीय आणि धार्मिक संघटना छुप्या पद्धतीने नाहीच तर जाहीरपणेही या प्रक्रिया घडवीत आहेत. म्हणजे गुलामाला गुलाम ठेवायचे आणि वरच्या जातीने त्यावर सत्ता गाजवायची; बाबासाहेबांनी तर अशा सत्तेला सुरुंगच लावला. मात्र, आजही आपण अशा संघटनांना पाठबळ देणे स्वतःची प्रतिष्ठा मानतो. हे सगळ्यात दुर्दैवी आहे. अतिउच्च जातीतला कुठला माणूस रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेला दिसत नाही. मात्र जातीय-धार्मिक संघटना बहुजनांचा योग्यप्रकारे वापर करताना दिसतात.
यावेळी डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अंकुश कदम यांनी प्रास्ताविक केले. वसंत कदम यांनी सूत्रसंचालन तर विश्वनाथ कदम यांनी आभार मानले.