८ एप्रिलपासूनसमर कॅम्प फॉर स्पेशल किड्स
कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे व नवदिव्यांग फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून स्वमग्न (गतीमंद) मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले आयडियल स्पेशल स्कूल सुरु केले जाणार आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यात जवळपास 500 पेक्षा जास्त स्वमग्न (गतीमंद)विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्गच्या बाहेर पाठवावे लागत होते मात्र आता सिंधुदुर्गातच ही सोय होत असल्याचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी सांगितले.
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी,डॉ. अनिल नेरूळकर,
प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. नीलेश महिंद्रेकर, बुंदल पटेल, प्रा. पुरुषोत्तम पाताडे, प्रा. मंजिरी घेवारी उपस्थित होते.
डॉ. तायशेटे म्हणाले, ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यात स्वमग्न मुलांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व नवदिव्यांग फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून स्वमग्न मुलांसाठी शाळा सुरु केली जाणार आहे. डॉ. अनिल नेरुळकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविणे शक्य झाल्याचे डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले.शाळा सुरु झाल्यानंतर या मुलांना तज्ज्ञ शिक्षकांकडून शिक्षण दिले जाणार असून स्वमग्न मुलांमध्ये असलेल्या गुणांचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याकरिता नव दिव्यांग फाऊंडेशन सर्वप्रकारचे सहकार्य करणार आहे. स्वमग्न मुलांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या शाळेत स्पेशल एज्युकेशन, रिमेडीयल एज्युकेशन, अर्ली इंटरव्हेंशन, आर्ट्स बेस्ट थेरपी, फंकशनल व लाईफ स्किल ट्रेनिंग, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सायकोलॉजिस्ट, इनडोअर व आऊटडोअर गेम्ससह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सुरुवातीला वीस ते पंचवीस मुले घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
समर कॅम्प फॉर स्पेशल किड्स
जिल्ह्यातील स्वमग्न मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी १८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सकाळी ९ ते १२ यावेळेत आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये समर कॅम्प फॉर स्पेशल किड्स आयोजित केला आहे, अशी माहिती ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली.
स्वमग्न मुलांसाठी आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे याठिकाणी १८ एप्रिल ते १ मे या कालावधीत ९ ते १२ यावेळेत समर कॅम्प फॉर स्पेशल किड्सचे आयोजन केले आहे. यात मैदानी खेळ, संगीत, स्टोरी टेलिंग, सेन्सरी स्टेशन, डेली लिविंग स्कील, सामाजिक कौशल्ये सहभागी होणाऱ्या मुलांना शिकवली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी या मुलांना कॅम्प पाठावावे, कॅम्पसंबंधी अधिक माहितीसाठी (९३५९१९३६५९) या संपर्क क्रमांकावर संपर्क करून नावनोंदणी करावी, असे आवाहन श्री. तायशेटे यांनी केले.
फोटो :
कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अनिल नेरूळकर,प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. नीलेश महिंद्रेकर, , बुंदल पटेल, प्रा. पुरुषोत्तम पाताडे, प्रा. मंजिरी घेवारी.