सिंधुदुर्ग : आपला सिंधुदुर्ग म्हणजे प्रज्ञावंताची, प्रतिभावंताची खाण. याच कोकणच्या लाल मातीत शिकलेली अनेक मुलं आज जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर कोकणचा झेंडा फडकवत आहेत. अर्थात ज्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली होती त्यांनी आपल्या पाल्यानां उच्च शिक्षणासाठी पुणे, बेंगलोर, मुंबई सारख्या महानगरात तर काहींनी परदेशातही पाठवली पण अशी प्रचंड बुध्दीमत्ता असलेली अनेक मुलं मुली आहेत की स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची सोय नसल्याने पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात फिरत असताना आणि लोकांच्या समस्या ऐकताना प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख अनेक पालक व विद्यार्थीही करत आहेत.
ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था गेल्या काही वर्षात कार्यरत आहेत त्याठिकाणचे भरमसाठ शुल्क भरण्याची ऐपत नसते. श्रीमंताची मुलचं अशा शैक्षणिक संस्थात प्रवेश घेऊ शकतात. मग अशावेळी शेतकरी, कष्टकरी, गोर गरीबांच्या मुलानी शिकायचचं नाही का? सातत्याने गेल्या बारा वर्षापासून माध्यमिक व उच्चमाध्यमिक परिक्षेत या कोकणातील या सावंतवाडी मतदारसंघातील अनेक मुलं मुली गुणवत्ता यादीत येतात. काबाडकष्ट करणाऱ्यांची ही ग्रामीण भागातील मुले आहेत. गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी व साडेसात वर्षे मंञी म्हणून कार्यरत असलेल्याना का नाही एखादी शासकीय शैक्षणिक संस्था उभारता आली. साधी बालवाडी सुध्दा हे सुरु करू शकले नाही. उलट काही जुन्या जाणत्या मंडळीनी समर्पित भावनेने ज्या काही जुन्या व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था नावारूपाला आणल्या होत्या त्या शिक्षण संस्था म्हणजे राजकीय अड्डा करून त्या शाळांची अवस्था बिकट केली.
दहावी बारावी मेरीट मध्ये पास झालेली मुलं आपल्या इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारात काम करण्यासाठी शेजारच्या गोवा राज्यात जातात किंवा कुणाच्या तरी खाजगी दुकानात चार पाच हजारांसाठी सेल्समनची नोकरी करतात. परिस्थितीमुळे इच्छा व टॅलेंट असूनही शिकू शकत नाहीत. गेल्या अडीच वर्षात यांना महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.. आज जिल्हा परिषदांच्या शाळांची काय परिस्थिती आहे ? काही दुर्गम भागातील शाळामध्ये एकच शिक्षक चार चार वर्ग सांभाळत असतो. स्थानिक डी एड व बी एड झालेले शेकडो बेरोजगार नोकरीच्या संधी शोधत आहेत. शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने अनेक शाळामध्ये शिक्षक व मुलं जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत. मा. शिक्षणमंत्री शिकले त्या सावंतवाडील जि. प. देच्या शाळेची भिंत भर पावसाळ्यात कोसळली त्यामुळे त्या शाळेतील मुलांना भटवाडी येथील शाळेत स्थलांतरित करावं लागलं. ज्या शहरात हे मंञी महाशय राहातात आणि निवडणूका आल्या की या शहराने मला भरभरून दिल अशी मल्लिनाथी करतात त्या शाळेच्या साध्या इमारतीकडे शिक्षणमंत्री असताना लक्ष देता आल नाही ते ग्रामीण भागातील मुलांचा काय विचार करणार ? दोन महिन्यापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील एका प्राथमिक शाळेचं छप्पर कोसळले, नशीब मुल बाहेर होती. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी हा महाराष्ट्रातील शैक्षणिक यंत्रणा अतिशय कमकुवत करणारा असून शिक्षणक्षेत्राची वाट लावलेली आहे.
निवडणूका जवळ आल्या की उद्योगपतींच्या मदतीने सावंतवाडी मतदारसंघ शैक्षणिक हब करणार अशा घोषणा करायच्या आणि निवडून आल्यानंतर त्या सोयीस्कर विसरायच्या हा फसवणुकीचा फंडा मतदारानी गेली पंधरा वर्षे अनुभवला. यावेळी कितीही प्रयत्न केला तरी मतदार फसणार नाहीत. मला जर या मतदारसंघातील मायबाप मतदारांनी आशिर्वाद दिले नंतर शैक्षणिक सुविधा आणि कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरू करून स्थानिक रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील हा आपल्या लाडक्या भूमीकन्येचा शब्द आहे.