कणकवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, कोकणातील अनेक मतदार मुंबई व इतर उपनगरामध्ये राहतात. सध्या नियमित सर्व रेल्वे गाड्या फुल्ल असून तात्काळ तिकीट मिळणेही दुरापास्त आहे. त्यामुळे चाकरमानी मतदारांना कोकणात मतदानाला जाता यावे, यासाठी १९ रोजी जादा विशेष रेल्वे गाडी सोडण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त कणकवली मतदारसंघात सुमारे दोनशे ते तीनशे मतदार हे मुंबई व इतर उपनगरातील आहेत. या मतदारांना मतदानाला एका दिवसासाठी येणे शक्य आहे. राज्य शासनाने मतदानासाठी सुटीही जाहीर केली आहे.
मात्र, रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. एवढ्या मतदारांना तात्काळ तिकीट मिळणेही शक्य नाही. केवळ कणकवलीसाठी एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असतील, तर कोकणात कुडाळ, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणी येणाऱ्या अनेक मतदारांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे अशा मतदारांचा विचार करून मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ रोजी रात्री जादा विशेष रेल्वे गाडी सावंतवाडीपर्यंत सोडून ती मतदानादिवशी सायंकाळनंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करावी. याबाबत कार्यवाही झाल्यास अनेक चाकरमान्यांना आपला मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार आहे. सर्व उमेदवार व लोकप्रतिनिधींनी अशी जादा विशेष रेल्वे गाडी सोडण्यासाठी केंद्रस्तरावर पाठपुरावा करून प्रयत्न करावेत, अशी मागणीही होत आहे.