पत्नीचीही पोलीस ठाण्यात फिर्याद
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यात आल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबरच असभ्य वर्तन केल्या प्रकरणी मयूर मोहन सावंत (वय ४५, रा.वरवडे सावंतवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण केल्या प्रकरणी मयूर सावंत याच्या पत्नीनेही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मयूर सावंत याचे त्याची पत्नी मानसी हिच्या बरोबर सकाळी दहा वाजता भांडण झाले. यात पत्नीला मार बसल्याने तिने फोन वरून पोलीस स्थानकात मारहाण होत असल्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस शिपाई सुप्रिया भागवत ह्या वरवडे सावंतवाडी येथे गेल्या. तेथे जाऊन त्यांनी तक्रारदार मानसी सावंत यांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार मानसी सावंत हिने आपल्या पती विरोधात मारहाणीची तक्रार नोंदवली. यानंतर दुपारी बारा वाजता आरोपी मयूर सावंत याने पोलीस ठाण्यात येऊन दारूच्या नशेत धिंगाणा घातला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केले. या प्रकरणी मयूर सावंत याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.