कोल्हापूर | यश रुकडीकर : पाण्याचे पितळी मीटर चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यकडून १,०८,००० रुपये किंमतीचे एकूण ३९ मीटर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पाण्याचे पितळी मीटर चोरी करणाऱ्यांचा मागोवा घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार सुरेश पाटील,राम कोळी, सागर माने,विनोद कांबळे,संजय पडवळ,राजेंद्र वरंडेकर यांना खबर लागली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदिप मस्के हाच ह्या सर्व मीटर चोऱ्यांच्या मागचा मुख्य संशयित आहे व तो चोरीचे मीटर विक्री करण्यासाठी कबनुर ओढ्या जवळ, ता. हातकणंगले येथे येणार आहे.सदर ठिकाणी सापळा लावून पोलिसांनी प्रदिप बाळू मस्के,वय२४, रा.भगतगल्ली , तारडाळ, ता. हातकणंगले याला अटक केली.त्याकडील १० पितळी मीटर त्याने पोलिसांच्या हवाली केले.सखोल चौकशीअंती आणखी चोरी केलेले मीटर बाळू आनंदराव गोसावी, रा. खोतवाडी, तारडाळ,ता. हातकणंगले ह्याच्याकडे असल्याचे त्याने कबूल केले.बाळू गोसावी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्याने प्रदिप मस्के याच्याकडून पाण्याचे पितळी मीटर विकत घेतल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याच्याकडून २९ मीटर जप्त केले आहेत.दोन्ही संशयितांकडून ३९ मीटर जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव,पोलीस उपनिरिक्षक जालिंदर जाधव, अंमलदार सुरेश पाटील,राम कोळी,विनोद कांबळे, संजय पडवळ,सागर माने,अमित सर्जे,कृष्णात पिंगळे,गजानन गुरव,राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.