गणेशोत्सव सर्वांनी आनंद, उत्साहात व शांततेत साजरा करुया ; मुख्याधिकारी गौरी पाटील
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवलीत प्रवासी संघातर्फे गेली काही वर्षे गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमान्यांचे व वाहनचालकांचे स्वागत केले जाते. हा स्तुत्य उपक्रम आहे. वाहनचालकांमध्ये या निमित्ताने सुखकर प्रवासासाठी प्रवासी संघातर्फे जनजागृती केली जाते. त्यामुळे उत्सव काळात वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहने चालवावीत. समाजातील सर्व घटकांनी व चाकरमान्यांनी एकत्रित येवून गणेशोत्सव सर्वांनी आनंद, उत्साहात व शांततेत साजरा करुया असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.
कणकवली पटवर्धन चौक येथे प्रवासी संघातर्फे दरवर्षीप्रमाणे कोकणात येणा-या चाकरमानी , वाहन चालकांचे स्वागत व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथुन खाजगी बसने आलेल्या चाकरमानी व वाहनचालकांचे गुलाबपुच्छ , चहा , जनजागृतीपर माहितीपत्रक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले , कणकवली मंडल अधिकारी मेघनाथ पाटील, प्रवासी संघ अध्यक्ष मनोहर पालयेकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री , प्रवासी संघ सल्लागार सिताराम उर्फ दादा कुडतरकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, मानवी हक्क जिल्हाध्यक्ष राजन भोसले, सखाराम सपकाळ, राजन रेगे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पत्रकार भगवान लोके , प्रवासी संघ सचिव विलास चव्हाण, उपाध्यक्ष रमेश जोगळे , सदस्य सुभाष राणे , संदेश मयेकर, मोहन सावंत, रविंद्र कडुलकर, उदय सावंत, जनार्दन शेळके, अर्जुन राणे, केशव जाधव, महानंद चव्हाण, सुगंधा देवरुखकर, श्रद्धा कदम, मयुर ठाकुर , पूजा सावंत, हेमंत शिरसाठ, अमित मयेकर यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस निरिक्षक मारुती जगताप म्हणाले , गणेश उत्सव काळात विघ्नहर्ता सुखकर्ता चे आता आगमन होईल त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचे आगमन होत आहे. कणकवली पोलीस विभागामार्फत आम्ही गणेश भक्तांचे , चाकरमान्यांचे स्वागत करतो. हा सण शांततेत साजरा करण्यासाठी आमच्या कडून चोख नियोजन केलेले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी वाहनचालक व व्यावसायिकांनी जागेचा वापर करावा. प्रवासी संघाने हा कार्यक्रम आयोजित करत चांगली जनजागृती केली आहे.
जिल्हा बॅंकेचे संचालक सुशांत नाईक म्हणाले , कणकवली प्रवाशी संघातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. चाकरमान्यांचे स्वागत केलं जाते. चांगला उपक्रम त्यांचा आहे. सिंधुदुर्गात फक्त कणकवलीत प्रवासी संघाकडून चाललेले काम कौतुकास्पद आहे. विविध समस्या घेवून हा प्रवासी संघ सातत्याने विविध विभागांना पत्रव्यवहार करत आहे.
प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर म्हणाले , प्रवासी संघ हा चाकरमान्यांचे स्वागताचा कार्यक्रम गेली ७ वर्षे करत आहे. या स्वागता दरम्यान व्यसन मुक्त प्रवास , वेगावर नियंत्रण ठेवून वाहनचालकांनी वाहने चालवावीत. याबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्रवासी संघाकडून कणकवली रेल्ले स्थानक फलाटावर शेड ची मागणी केलेली आहे. तसेच एसटी आगारामध्ये प्रवाशांना स्वच्छ पाणी , तसेच स्वच्छतागृहामध्ये नेहमी साफसफाई व्हावी , ग्रामीण भागात एसटी बस सेवा सातत्यपूर्वक राहावी या मागण्या सातत्यपूर्वक आहेत , प्रवाशांना सुखाचे दिवस येण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने राहतील.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले , तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे व प्रवाशांचे आभार प्रवाशी संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी मानले.