उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू यांना निवेदन
कणकवली : हळवल फाट्यावरील हळवल – कळसुली मार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून याठिकाणी अपघात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नव्हती. याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर तसेच हळवल ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे, अनंत राणे यांच्यासह माजी उपतालुका प्रमुख राजू राणे, माजी सरपंच रवींद्र परब आदी उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू यांच्याशी चर्चा करण्यात आली. नादुरुस्त रस्त्याची गणेशोत्सवापूर्वी डागडुजी झाली पाहिजे. अन्यथा आमच्या पद्धतीने आक्रमक होऊन ते करून घेऊ असा इशारा देण्यात आला. यावेळी श्रीम प्रभू यांनी ठेकेदाराला संपर्क करून तात्काळ ते काम करण्याची सूचना केली. तसेच एक – दोन दिवसांत ते काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही ठेकेदारांनी दिली.