मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार बैठक
मुंबई : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल झाले. यातच एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत कृती समितीची एक बैठक पार पडली. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने ऐन गणेशोत्सव काळात एस्टी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने काम बंद आंदोलन पुकारल्याने २५१ आगारांपैकी ३५ आगार पूर्णतः बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळण्याची आहे. तसेच २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ, ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी व घरभाडे भत्त्याची थकबाकी अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत.
सरकारसोबत चर्चेसाठी केव्हाही तयार आहे. मात्र प्रत्येकवेळी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कोणकोणत्या आगारात बससेवा ठप्प
३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत. ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. खान्देशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. अघोषित संप ठरवला बेकायदेशीर मा. औद्योगिक न्यायालयाने आजचा अघोषित संप बेकायदेशीर ठरविला आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संप करू नका चर्चेला या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेऊन चर्चेला यावे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उद्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात गणपती येत आहेत. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि आवाहन की आपण संप करु नये. सकारात्मक चर्चेतून आपण मोठे मोठे प्रश्न सोडवलेले आहे.
गणपती उत्सव हा इतका मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. असे असताना अशा प्रकारचे आंदोलन होणे हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. जनतेचा विशेषतः गणेशभक्तांचा विचार करावा. गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्यावा.
-उदय सामंत, उद्योगमंत्री