राजकोट येथे घडलेल्या राड्यानंतर वेंगुर्ला राड्याची आठवण ताजी
सावंतवाडी : मालवण राजकोट येथे झालेला राडा लक्षात घेता पुन्हा एकदा वेंगुर्लात घडलेल्या राड्याची आठवण ताजी झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा “राडा संस्कृतीशी” जोडण्याचा प्रकार सुरू आहे अशी टीका, शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. दरम्यान नारायण राणे व दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी टिका केली असून त्यांना संस्कृतीचे भान राहिले नाही,असाही आरोप केला आहे. याबाबत श्री. परूळेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की ,”पुतळा पडला हे शुभसंकेतच आहेत, ह्यातून पुढे चांगलंच घडेल. आता १०० फूटी पुतळा उभारू ” अशी संतापजनक वल्गना शिक्षणमंत्री करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर गायबच झालेले आहेत. पुतळ्याची काळजी घेण्याची जबाबदारी खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. पण पुतळा नौदलाने बांधला असं जनतेची दिशाभूल करणारे विधान करून ते नामानिराळे होऊ पाहात आहेत. सगळाच प्रकार खरोखरच महाराष्ट्रात आणि त्यात देखील माझ्या सिंधुदुर्गात घडत आहे…यावर अजूनही विश्वास ठेवणं कठीण आहे.असे.श्री. परुळेकर म्हणाले आहेत.