कणकवली : उबाठा समर्थकांनी राजकोट किल्ल्यावर घातलेला ‘राजकीय राडा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुसंस्कृत प्रतिमेला काळिमा फासला आहे. विरोधकांनी किमान छत्रपतींच्या विषयात राजकारण करु नये. महायुती सरकारच्या विरोधात जनतेची माथी भडकवण्याचा प्रकार महायुतीचे नेते करत आहेत.
आमदार वैभव नाईक यांना पराभव दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयात स्टंटबाजीचा खटाटोप करत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान अन् स्वाभिमान आहे. अनेकांच्या जगण्याची आस म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. सकल मराठा समाजाचे आराध्य दैवत म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या पवित्र मालवण भूमीत जेव्हा त्यांच्याच नावाने गलिच्छ राजकारण केलं जातं तेव्हा आपसूकच प्रत्येक शिवप्रेमींच्या माना शरमेने खाली झुकतात. शिवछत्रपतींचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्ष आपले राजकीय हेवेदावे विसरून पुतळ्याच्या पुनर्बाधणीसाठी एकत्र येऊन आपली भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र, ज्यांच्यासाठी शिवछत्रपती हा केवळ आणि केवळ राजकारणाचा मुद्दा राहिलाय त्या ‘उबाठा’ समर्थकांनी अखेर आपली विकृत मानसिकता जनतेला दाखवून दिल्याचा टोला संजना सावंत यांनी लगावला आहे.
शिवछत्रपतींचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा पडल्याच्या घटनेचं केव्हाच समर्थन होऊच शकत नाही. ते आम्ही करणार देखील नाही. जे ठेकेदार याला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि ती होणारच यासाठी आम्ही देखील आग्रही आहोत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. शासन त्यांच्यावर योग्य कारवाई करेल याची आम्हाला खात्री आहे. मात्र, एकीकडे कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि तिची झालेली निघृण हत्या या प्रकरणावर अवाक्षर देखील न काढणाऱ्या उबाठा आणि माविआघाडीच्या नेत्यांची पावलं बदलापूर येथील घटनेकडे आणि तिथून मालवण भुमिकडे कशी काय वळतात ? ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होईल. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महायुतीच्या सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारच्या विरोधात जनतेची माथी भडकवण्याचा हा प्रकार आता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यासाठी राजकोट किल्ला येथील शिवछत्रपतींचा पुतळा पडल्याच्या घटनेचा आधार घेतला जातोय. ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांना खोटी आश्वासन दिली आणि विकासाला मालवणच्या जनतेपासून दूर ठेवलं त्या बिनकामी आमदारांना आपला पराभव समोर दिसतोय म्हणून आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांना ‘प्रकाशझोतात’ राहण्याचा हा कुचकामी प्रकार आ. वैभव नाईक करीत आहेत, असा आरोप संजना सावंत यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे, सुजाण आहे, सुसंस्कृत आहे. येथील खासदार नारायण राणे, माजी खास. निलेश राणे आम. नितेश राणे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे इथे ‘अरे ‘ला ‘कारे ‘म्हणूनच उत्तर देण्याची हिंमत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हे विरोधकांनी नक्की लक्षात ठेवावे. रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माझ्या राजाचा ‘शिवछत्रपतींचा’ तेजस्वी पुतळा पुन्हा एकदा समस्त सिंधुदुर्गवासियांचे प्रेरणास्रोत असलेल्या ‘राजकोट ‘किल्ल्यावर त्याच डौलाने उभा राहील, आमचे महायुतीचे सरकार त्यासाठी काम करत आहे, असा विश्वास संजना सावंत यांनी व्यक्त केला.