ओरोस : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथे तलाठी कार्यालयात संतोष पवार हे शासकीय कामकाज करत असताना भर दिवसा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ अत्यंत तीव्र व दुःखद भावनेने निषेध व्यक्त करत आहे. त्या निषेधार्थ सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकुन नायब तहसीलदार तहसिलदार या काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले असून जिल्ह्यात आज काम बंद आंदोलन सुरु आहे. या घटनेमुळे मयत तलाठी संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी शासनास दिलेले पत्र व घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजीच्या एक दिवसीय काम बंद आंदोलनात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ सहभागी होणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकुन नायब तहसीलदार तहसिलदार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे निवेदन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एस. व्ही, गवस, उपाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी जिल्हाधिका- यांना दिले आहे.