उद्या मृतदेह बाहेर काढणार ; अज्ञाताच्या विरोधात सावंतवाडीत गुन्हा दाखल
सावंतवाडी : अंगावर चिरे पडल्यामुळे मृत झालेल्या चिमुरडीचा मृतदेह गुपचूप जंगलात दफन केल्याचा धक्कादायक प्रकार मळेवाड येथे घडला आहे. ही घटना ८ दिवसांपुर्वी राजगड रिसाॅर्टच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घडला. याबाबतची माहिती काही जागरूक नागरिकांनी दिल्यानंतर त्या ठिकाणी सावंतवाडी पोलिसांनी धाव घेतली आहे. पोलीस पाटील दिगंबर मसुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नेमका प्रकार काय ? याची माहिती पुढे येण्यासाठी दफन केलेला मृतदेह उद्या पुन्हा बाहेर काढण्यात येणार आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मळेवाड येथे एका चिरेखणीवर काम करणाऱ्या ओरीसा येथील एका परप्रांतीय कामगाराच्या ६ वर्षाच्या मुलीच्या अंगावर चिरे पडल्याने जखमी होवून जागीच ठार झाली. ही घटना सात ते आठ दिवसांपूर्वी घडली. डंपर पलटी झाल्यामुळे हा प्रकार घडला.
दरम्यान या प्रकाराची वाच्यता झाल्यास आपल्याला अडचण होईल या भीतीने डंपर चालकांने मृत मुलीच्या आई – वडिलांच्या संमतीने काही लोकांच्या मदतीने चिमुरडीचा मृतदेह परिसरातील जंगलात दफन केला. या प्रकाराची वाच्यता होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. मात्र हा प्रकार डंपर अपघातग्रस्त झाल्यामुळे घडल्यामुळे गावात या प्रकाराची चर्चा झाली.
त्यानंतर याबाबतची माहिती काही जागरूक ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी ( आज ) धाव घेत या प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तेथील काही नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. यावेळी बाजूला असलेल्या चिमुरडीच्या डोक्यात त्यातील एक चिरा पडला. डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच ठिकाणी त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. यावेळी कुणी अडचणी देऊ नये यासाठी संबंधितांनी मृतदेह त्या ठिकाणी पुरला मात्र काही जागरूक ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार दिल्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यानुसार रात्री उशिरा आम्ही त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. माहिती घेतली असता हा प्रकार झाल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. मात्र तत्पूर्वी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या खोलात जाणे गरजेचे आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय? याची माहिती घेण्यासाठी उद्या त्या मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात येणार आहे. त्या नंतर शवविच्छेदन करून पुढील चौकशी करण्यात येणार आहे.
याबाबत आवश्यक असलेली सावंतवाडी न्यायालय व तहसीलदारांची परवानगी घेण्यात आली आहे. उद्या सकाळी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी जाऊन पुढील कार्यवाही करणार आहे.