दोडामार्ग : शहरात गावडेवाडी येथील गयापाल कश्यप यांच्या भंगार गोडाऊनला आग लागून तब्बल ४ लाखाचे साहित्य जळून खाक झाले. ही आग लावली असावी, असा संशय श्री. कश्यप यांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान अग्निशमन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेली काही वर्षांपासून दोडामार्ग शहरात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेजवळ गायपाल कश्यप याचे भंगार साठवणूक गोडाऊन आहे. यामध्ये रद्दी, बाटल्या, पत्रे, कागदी पुढे आदी भंगार साहित्याचे साठवणूक करून ठेवण्यात येते. कश्यप हा या तालुक्यात पुठ्ठा पुढेवाला म्हणून परिचित आहे. प्रत्येक गावातून भंगार गोळा करून या गोदामात त्याचा साठा करत असतो. दरम्यान पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. या आगीत १८ हजार रुपये किमतीचा वजन काटा, ७० हजार रुपये किमतीची प्रेस मशीन याबरोबरच इतर साहित्य मिळून सुमारे ४ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे कश्यप याने सांगितले. याच गोडाऊनमध्ये रिकाम्या बाटल्यांचा मोठा साठा होता. तो मात्र सुदैवाने बचावल्याने आणखी नुकसान टळले.
सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या काही जणांना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. तर नगर पंचायतीच्या बंबच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली. मात्र आतमध्ये कागदी पुढे असल्याने ही आग धुमसत असल्याने पुन्हा विझवण्यासाठी बंब बोलवावा लागला. दरम्यान याबाबत गयापाल कश्यप याने ही आग मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्याने आपला साथीदार असलेल्या कर्नाटक येथील व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. बुधवारी कश्यप याचे त्याच्यासोबत भांडण झाले होते. त्या रागातून ही आग त्यानेच लावली असावी असा संशय असून याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचेही त्याने सांगितले.