घोटगे ग्रामस्थांची एस. टी. कणकवलीचे विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी
कुडाळ, प्रतिनिधी : कणकवली आगारातून सायंकाळी ६ वाजता सुटणारी कणकवली-घोटगे बसफेरी पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी घोटगे ग्रामस्थांनी एस. टी. महामंडळ कणकवलीचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कणकवली बसस्थानकातून सायंकाळी ६ वाजता घोटगेला जाणारी बस सुरु होती. या बसमधून विद्यार्थी नोकरीनिमित्त जाणारे ग्रामस्थ व प्रवासी प्रवास करीत असत. परंतु, या बसफेरीची वेळ सायंकाळी ६ ऐवजी ७ केल्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. दुपारी ३ नंतर घोटगेसाठी बस नसल्यामुळे सदर बससाठी प्रवाशांना चार तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये एसटी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी आहे. कणकवली बसस्थानकात दुपारी ३ वाजता लागणाऱ्या बस फेरी बदल करून २.४५ केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करता, प्रशासने दुपारी २ ची जादा बसफेरी सुरु करावी. तसेच सदर बसफेरीतून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करीत असल्यामुळे ती बस रात्री ८ च्या सुमारास घोटगे बाजारात येत आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थी व ग्रामस्थाचा रात्रीच्यावेळीचा बसथांबा ते घरापर्यंतचा प्रवास हा जंगल भागातील आहे. तसेच या भागातील रस्त्यावर भटक्या जनावरांचा धोका असतो. प्रवासादरम्यान विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सुरक्षिततेचा विचार करता यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेत कणकवली- घोटगे बसफेरी पुर्ववत चालू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली.
यावेळी घोटगे सरपंच चैताली, चेतन ढवळ, माजी जि. प. सदस्य लाॅरेन्स मान्येकर, जांभवडे सरपंच अमित मडव, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, नारायण गावडे, ऋषिकेश ढवळ, ओमकार ढवळ, राॅनी मान्यकर, अशोक तांबे, मकरंद केळुसकर, नारायण गावडे आदी उपस्थित होते.