संपादक | मयुर ठाकूर : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ३ एप्रिल रोजीच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने कणकवली तालुक्यासह जिल्हयात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आचारसंहितेनंतर वृद्धांना विमानाने तिरुपती दर्शन, वृद्धांना पंढरपूर वारी तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर, पाककला स्पर्धा, बच्चे कंपनीसाठी धम्माल मजामस्ती कार्यक्रमही होणार आहेत.
यामध्ये मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे. तर रात्री ९ वा. कनेडी बाजारपेठ येथेच चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण (मालक – देवेंद्र नाईक) यांचे ‘वेतोबा’ हे लोकप्रिय दशावतारी नाटक सादर होणार आहे.
बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम, एसटीएस परीक्षेचा निकाल जाहीर करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तर सकाळी ११ वाजता कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथाचा (शववाहिनी) लोकार्पण सोहळा होणार आहे.
३ एप्रिल रोजीच संध्याकाळी ७ वा. संदेश सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे. सायं. ७.३० वा. संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वा. नंतर स्नेहभोजन होणार आहे.
ज्येष्ठांना मोफत देवदर्शन तर लोकसभा निवडणूक आचार संहितेनंतर मोफत देव दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ५० गरीब वृद्धांना विमानाने तिरुपती दर्शन घडविण्यात येणार आहे. तर १५० गरीब वृद्धांना सालाबादप्रमाणे पंढरपूरवारी घडविण्यात येणार आहे.
महिला, बच्चे कंपनीसाठी कार्यक्रम शनिवार ११ मे रोजी कनेडी बाजारपेठ येथे महिलांसाठी पाककला व होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, कुलर, मिक्सर, कुकर आदी अनेक बक्षिसांची लयलूट होणार आहे. तर रविवार १२ मे रोजी एक दिवस छोट्या दोस्तांचा या टॅगलाईनखाली बच्चे कंपनीसाठी भरगच्च कार्यक्रमांची धमाल मस्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये आनंद जत्रा, फुड फेस्टिव्हल, जादूचे प्रयोग, मनोरंजक खेळ आणि बक्षिसांची लयलूट करण्याचा आनंद लुटता येणार आहे. तर रविवार २ जून रोजी आगळी अशी आंबे खाण्याची स्पर्धा होणार आहे.
स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे तसेच वाढदिन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत यांनी केले आहे.