0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

सावंतवाडीत एसटी विभाग नियंत्रकांना घेराव

बसस्थानकाच्या दुरवस्थेवरुन प्रश्नांचा भडीमार : भर पावसात आगार परिसर फिरवला

सावंतवाडी : गेल्या सहा वर्षांपासून सावंतवाडी एसटी आगार उभारण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. सध्या आगारात प्रवाशांची गैरसोय होत असतानाच गुरांच्या गोठ्यात असल्यासारखे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. बैठक व्यवस्थेवर पावसाचे पाणी पडत आहे. जिल्हा एसटी परिवहन व्यवस्थापक अभिजीत पाटील यांना भर पावसात दैन्यावस्था दाखविली आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या गुरुवार १८ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.

एसटी विभाग नियंत्रक सावंतवाडी बस स्थानकात प्रवासी राजा दिनाच्या कार्यक्रमासाठी आले असता सावंतवाडी एसटी स्थानकाच्या दुरवस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी त्यांना जाब विचारात प्रश्नांचा भडीमार केला.

साळगावकर म्हणाले, याप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी आंदोलने छेडली. वर्षभर पाठपुरवठा करूनही सरकारने दुर्लक्ष केला. प्रवासी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी अक्षरशः दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत एसटी पकडण्यासाठी पळत असतात ही स्थिती गेले सहा वर्ष अशीच आहे. सावंतवाडी बसस्थानक हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाजवळ आहे. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी १८ जुलै रोजी घंटानाद करणार असल्याचे ते म्हणाले.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, राजा शिवाजी चौक उपाध्यक्ष दीपक सावंत, मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे, रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर पराडकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, अशोक पेडणेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर व अन्य यावेळी उपस्थित होते.

सावंतवाडी बसस्थानकाची पुरती दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल साळगावकर यांनी विभाग नियंत्रकांना विचारला. तर स्थानिक आमदारांचे असलेले दुर्लक्षच या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी तातडीने स्वच्छतागृह, जेथे लाईट नाही तेथे सुविधा द्याव्यात. जेथे गळती लागल्याने प्रवासांची गैरसोय होत आहे ते काम करावे. पाणी सर्वत्र वाहत आहे. तेथे खातरजमा करून पर्यायी पाणी जाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले. येत्या सोमवारपर्यंत जास्तीत जास्त गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!