पालकमंत्री आता तरी बोलतील का? माजी आम.परशुराम उपरकर यांचा सवाल
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांकडे नेमका कोणता कार्यभार आहे? मुंबईचा कार्यभार असल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता हे मुंबईला ठाण मांडून असतात त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे याचा खुलासा करावा. सिंधुदुर्गात अतिवृष्टी काळात लोक हैराण झाले असताना कार्यकारी अभियंता मात्र मुंबईवारी करतात.असा टोला लगावताना
जॉब वर्कच्या नावाखाली लाखो रुपयांची छोटी कामे केली जात आहेत. मग स्वतःच्या कार्यालयातील सीसीटीव्ही चालू करण्यासाठी निधी नाही का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.साऱ्या प्रकारांबाबत पालकमंत्री तथा बांधकाममंत्री बोलतील का? असेही ते म्हणाले.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले,अतिवृष्टीचा इशारा असतानाही कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता मुंबईला कशासाठी जातात? अधिवेशन काळात दोन आठवडे ते मुंबईलाच होते. बांधकाम मंत्र्यांच्या पीएच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. तसेच त्यांच्या कार्यालयात एक सेवानिवृत्त कर्मचारी इंटेरियरची कामे कशी करतो? एक ठेकेदारही कार्यालयात बसून कामे करतात. या साऱ्या प्रकारांबाबत पालकमंत्री तथा बांधकाममंत्री बोलतील का?असे सांगताना श्री. उपरकर म्हणाले,कार्यकारी अभियंता सातत्याने आठवड्यातून तीन ते चार दिवस मुंबईला असतात. ७ व ८ जुलै रोजी प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा दिलेला असतानाही कार्यकारी अभियंता मुंबईला होते. संबंधीत अधिकारी सातत्याने मुंबईला का असतात?
कार्यकारी अभियंता रुजू झाल्यापासून कार्यालयातील सीसीटीव्ही बंद आहेत. जॉब वर्कच्या नावाखाली लाखो रुपयांची कामे केली जात आहेत. मग कार्यालयातील सीसीटीव्ही चालू करण्यासाठी निधी नाही का? कार्यालयात सातत्याने ठेकेदारांचा वावर असतो. तो सीसीटीव्हीत कैद होऊ नये, म्हणून सीसीटीव्ही चालू करत नाहीत असा आरोप करताना ते म्हणाले,अनेक कार्यालयांतर्गत इंटेरियर, सुशोभिकरणाची कामे खात्यातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यालाच दिली जात आहेत. कार्यालयात एका ठेकेदाराचा सातत्याने वावर असतो. अधिवेशन काळात हे अधिकारी नेमके कोठे होते, त्याबाबतचे लोकेशन पालकमंत्र्यांनी घ्यावे. फोंडाघाट येथे रस्त्याला समस्या निर्माण झाली त्यावेळी हे अधिकारी मुंबईलाच होते. अडचणीच्या कामांच्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून काम पुर्ण झाल्यावर आपण जातात. या साऱ्या प्रकाराची चौकशी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकामंत्री यांनी करावी असे परशुराम उपरकर म्हणाले.