3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

जलजीवनच्या अपूर्ण कामांबद्दल भाजप ठेकेदारांचीही तक्रार करा

सतीश सावंत यांचे आ. राणे यांना आव्हान

दहा दिवसांत सर्वच कामांचा पंचनामा करणार

कणकवली | मयुर ठाकूर : शिवसेनेचे काम करत असलेले रामदास विखाळे यांना टार्गेट करून ते आपल्या पक्षात कसे येतील यासाठी आ. नितेश राणे दबावतंत्र वापरत आहेत. विखाळेंची कामे अपूर्ण असतील तर त्यांची तक्रार जरूर करा, परंतु आ. नितेश राणे यांनी गांधीनगर, कलमठ, वरवडे, हरकुळखुर्द, नाटळ या भागात जलजीवनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या भाजपमधील ठेकेदारांचीही तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करावी. त्यांना जनतेबद्दल एवढीच काळजी असेल तर अपूर्ण कामे असलेल्या त्यांच्या ठेकेदारांचीही यादी जाहीर करावी. राजकीय फायद्यासाठी आम्ही कोणत्याही ठेकेदाराला वेठीस धरले नाही, मात्र आ. नितेश राणे जर आमच्या ठेकेदारांना त्रास देत असतील तर जलजीवनसह मायनिंगची रॉयल्टी थकवणाऱ्या भाजपसहीत सर्वच ठेकेदारांच्या कामांच्या चौकशीही मागणी करावी लागेल, असा इशारा शिवसेना विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला. कणकवलीत विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, धीरज मेस्त्री, सिध्देश राणे उपस्थित होते.

सावंत म्हणाले, नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत रामदास विखाळे यांना आपले काम करण्यासाठी गळ घातली होती. मात्र त्यांचे पूत्र त्यांची तक्रार करतात. आधी त्यांनी कुटुंबात एकमत करावे. आ. नितेश राणे यांनी जनतेच्या भल्यासाठी त्यांच्या ठेकेदारांची कामे जाहीर करावीत, आम्ही आमच्या ठेकेदारांची नावे जाहीर करतो. संजय आग्रेंची ज्यावेळी आ. राणे यांनी तक्रार केली तेव्हा आम्ही विरोध केला नाही.

मात्र, आग्रेंबरोबरच मायनिंगची रॉयल्टी थकवणारे जे भाजपचे ठेकेदार आहेत त्यांचीही तक्रार आ.राणे यांनी करावी. नितेश राणे यांना विकासाबद्दल काहीही पडलेले नाही. करूळ घाट सहा महिने बंद आहे, जे काम झाले आहे ते निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. त्या ठेकेदाराचे ५० टक्के बिल देवून झाले आहे, असे असताना आ. राणे यांनी विधानसभेत याबाबत कधी आवाज उठविला नाही.

निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांच्या कामांची चौकशीची मागणी आ.राणे यांनी करावी, असे सावंत म्हणाले. स्वतःच्या पक्षाच्या ठेकेदारांना पाठीशी घालायचे आणि शिवसेना पक्षाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना त्रास द्यायचा हा आ. राणेंचा डाव आहे. पुढील दहा दिवसात आम्हीही जलजीवनच्या व बांधकामच्या सर्वच कामांचा पंचनामा करू. आज जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. जनतेला आयुष्यमान भारतचा फायदा मिळत नाही. या सर्वच बाबतीत शिवसेना आवाज उठवणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

काजू अनुदान जीआरची होळी करणार

सावंत म्हणाले, शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना किलोमागे १० रु. अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यात जाचक अटी घालून शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. आजवर किती खरेदी विक्री संघांनी काजू बीची खरेदी केली? कृषी उत्पन्न बाजार समितीही केवळ नावापुरतीच आहे. किती शेतकऱ्यांना काजू खरेदी करून पावत्या दिल्या आहेत ? यात कुणालाही पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे या जीआरची कृषी कार्यालयासमोर आम्ही लवकरच होळी करणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!