सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या मार्गावरील पेडणे बोगद्यात निर्माण चिखलाच्या अडथळ्यामुळे काल पासून ठप्प असलेली कोकण रेल्वेची वाहतूक अखेर पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. पेडणे बोगद्यातून रात्री ८.३५ वाजता पहिली ट्रेन रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सायंकाळपासून ठप्प झाली होती. गोवा राज्यातील पेडणे बोगद्यात पाण्याचे प्रवाह निर्माण होत माती व चिखल परसला. त्यामुळे रेल्वे मार्ग मातीखाली गेल्यामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. गोव्याच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या होत्या.
मात्र कोकण रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नांती अखेर बुधवारी सायंकाळी उशिरा कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यातील हा अडथळा दूर करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी कोकण रेल्वेची पहिली ट्रेन या भागातून रवाना करण्यात आली. याबाबतची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
तब्बल सतरा तासानंतर रेल्वे रुळावर आलेला चिखल साफ करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. चिखल हटविण्यासाठी तब्बल २०० कर्मचारी त्या बोगद्यामध्ये अविरत काम करीत होते. तर रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या कामावर लक्ष ठेवून होते.
पेडणे बोगद्यातील घटनेमुळे वंदे भारत एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेससह जवळपास १९ गाड्या कोकण रेल्वेने रद्द केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्याआधी रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या आहेत. बुधवारी रात्री ८.३५ नंतर कोकण रेल्वेची बंद पडलेली वाहतूक पूर्ववत झाल्यामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.