कणकवली : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कणकवली तालुक्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी घेतलेल्या नोंदीत ५९ मिमी इतकी नोंद झाली आहे. तर तालुक्यातील मराठा मंडळनजिक, वागदे येथील केटी बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते.
तर येथील गडनदी ने बहुतांशी धोक्याची पातळी ओलांडल्याने शिवडाव, हळवल या गावांमध्ये काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बऱ्याच वाड्यांचा संपर्क देखील तुटला होता. तर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तर शिवडाव येथे मुख्य मार्गावर तांबटवाडी येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीच्या लावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोर्डवे येथील नितीन राठवड यांच्या घरात पाणी शिरले होते. यावेळी घरातील चार जणांपैकी तीन जण घराबाहेर होते तर एकजण घरात अडकला होता. त्याला सुखरूप घराबाहेर काढण्यात आले.