स्थानिक युवकांची कामगिरी
सिंधुदुर्ग : स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर भेडशी येथील नदीत वाहून गेलेल्या तिघांना वाचविण्यात यश आले आहे. तिघेही जण कणकवली येथील असून भेडशी येथे ते मित्राकडे आले होते. सुहास परब, प्रसाद क्षीरसागर व श्रीपती करण अशी त्यांची नावे आहेत. घरी परतत असताना पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा चालकाचा प्रयत्न फसला आणि कार पाण्याबरोबर वाहून गेली. बोलेरो कार वाहत जात पुढे १०० मीटरवर झाडीत अडकली आणि त्यामुळेच दैव बलवत्तर म्हणून तिघेजण बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली येथील सुहास परब, प्रसाद क्षीरसागर आणि श्रीपती करण हे रविवारी भेडशी येथे आपल्या मित्राकडे आले होते. सायंकाळी घरी परतत असताना भेडशी पुलावर पुराचे पाणी आले होते. बरीच वाहने पाणी कमी होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, बोलेरो चालकाने पुरातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर पुरातून गाडी पुढे जाणार नाही हे लक्षात येताच त्याने गाडी रिव्हर्स नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने कार पुरात वाहून गेली.
स्थानिकांनी कार वाहून जाताच आरडाओरड केली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिकांनी पुढे नदीत जाऊन पाहिले असता कार झुडपात अडकलेली दिसून आली. स्थानिकांनी लगेच मदतकार्यात सुरुवात केली. प्रथम दोघांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. चालक गाडीच्या टपावर चढून बसला होता. त्यालाही स्थानिक युवकांनी लिलया संकटातून बाहेर काढत जीवदान दिले.
तिघेही युवक प्रचंड घाबरले होते. त्यांना आपली नावेही धड सांगता येत नव्हती. पोलिसांनी त्यांना धीर दिला. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उप निरीक्षक राऊत, पोलीस पाटील प्रकाश देसाई, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भेडशी पुलावर पाणी आल्याने धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे होते. तसे ब्रकेट लावणे आवश्यक होते. मात्र, संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढवला अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.