रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांनी सतर्क रहावे ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस येथे मुंबई – गोवा महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला. क्रिश्चनवाडी येथे महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्ग व लगतची घरे पाण्याखाली गेली आहेत. काही लोक सुरक्षित बाहेर पडली असून काही नागरिक अद्यापही घरात अडकून पडले आहेत.
पोलीस, आपत्ती व्यवस्थापन व नागरिक मदत कार्यासाठी बाहेर पडले आहेत. महामार्गाच्या दुतर्फा भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महामार्ग व या परिसरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
ओरोस ख्रिश्चनवाडी येथे महामार्गावर हे पाणी असल्यामुळे चर्च व त्या परिसरातील घरे पाण्याखाली गेली आहेत. महामार्गावर पाणी असल्यामुळे पोलिसांनी महामार्ग बंद केला आहे व यातील काही वाहने मुख्यालय सामाजिक न्याय भवन मार्गे जिजामाता चौक या मार्गे वळवली आहेत.
भारतीय हवामान खात्याने, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.