निलेश राणेंचा माजी खा. विनायक राऊतांना रोखठोक इशारा
मालवण : आज एका निवडणुकीत तुम्हाला पाडले, तोंड आवरा. नाहीतर या पुढील प्रत्येक निवडणुकीत कोकणी माणूस तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा रोखठोक इशारा भाजपा नेते निलेश राणे यांनी उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांना दिला आहे. कोकणी मतदारांवर पैसे घेतल्याचे आरोप सातत्याने माजी खासदार विनायक राऊत करत आहेत. त्याचा समाचार निलेश राणे यांनी घेतला.
निलेश राणे म्हणाले, जो कोकणी माणूस कधी सरकारकडे कर्जमाफी मागत नाही. कुठल्या बँकेचे कर्ज बुडवत नाही. तो स्वाभिमानी कोकणी माणूस पैशाने विकला जाईल का? कोकणी मतदारांची बदनामी करताना विनायक राऊताला लाज वाटायला हवी होती. मुंबईत पण मराठी माणसाने उबाठा सेनेकडे पाठ फिरवली. मुंबईत लालबाग परेल भांडुप दादर चा मराठी कोकणी माणूस आज तुमच्यासोबत राहिला नाही. याचे आधी आत्मचिंतन करा. कोकणी माणूस आपल्यापासून का दुरावला याचा अभ्यास करा. जर असाच कोकणी माणसाचा तुम्ही अपमान केलात तर आज एका निवडणुकीत तुम्हाला पाडले, तोंड आवरा नाहीतर यापुढील प्रत्येक निवडणुकीत कोकणी माणूस तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा रोखठोक इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.