3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

युवकाच्या मृत्यूप्रकरणी जेसीबी चालकास अटक | पोट ठेकेदारावरही गुन्हा दाखल

सावंतवाडी : जेसीबीच्या धडकेत जखमी होऊन मृत्यू पावलेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जेसीबी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहन बहादूर राठोड ( ३३, रा. देवरहिपरी बिजापूर, कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोटठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सावंतवाडी शहरातील खासगीलवाडा परिसरात राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी मनिष महादेव देसाई हा आपलं निकाल पत्र आणण्यासाठी महाविद्यालयात जात असताना जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणा मुळे जेसीबीच्या मागच्या दातांचा धक्का बसून गंभीर जखमी झाला होता. यात सदर युवकाचा गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संबंधित जेसीबी चालकावर या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, सदरच्या अपघातानंतर त्याने पोबारा केला होता. दरम्यान, हे काम सुरु असताना त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा अपघात झाला याप्रकरणी काम करणाऱ्या संबंधित पोट ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदोष मनुष्य वधाचे वाढीव कलम लावावे अशी मागणी मृत युवकाच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन केली होती.

त्यानंतर या अपघात व मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी हे वाढीव कलम लावले आहे. तर याप्रकरणी पोट ठेकेदारावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला सहआरोपी केला आहे. तर जेसीबी चालक मोहन बहादूर राठोड याला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जातं आहे.

ज्या कामाच्या ठिकाणी हा अपघात घडला त्या कामाचा मुख्य ठेकेदार व अन्य कोणी सहभागी संशयित यांचा समावेश असल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. सध्या संशयिताकडून माहिती घेतली जात असून बांबोळी गोवा येथे रुग्णालयात मयताचा अहवाल आणण्यासाठी सावंतवाडी पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी गेले आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती तपासी अधिकारी सरदार पाटील यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!