हळवल, कळसुली, साकेडी, हरकुळ गावांत घरांवर झाडे पडून मोठे नुकसान
१०० पेक्षा जास्त विद्युत खांब देखील कोसळले ; काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित
कणकवली | मयुर ठाकूर : हवामान खात्याने महाराष्ट्रात सिंधुदुर्गसह इतर ठिकाणी वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार १५ व १६ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारी १६ मे रोजी दुपारी २ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळ झाले व पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
कणकवली तालुक्यातील हवळल, शिवरल, कळसुली, शिवडाव, हरकुळ, सांगवे, कणकवली शहर, साकेडी या भागांमध्ये मोठे वादळ होऊन घरांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले.
हळवल मुख्य रस्त्यावर रेल्वे फाटकानजिक रस्त्यावर काजूचे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. तर हळवल परबवाडी येथे घरांवर झाडे कोसळून साधारणपणे २५ घरांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. येथीलच हळवल भाकरवाडी येथे शेती पंपाच्या केबिनवरील पत्रे व नजिक असलेल्या इमारतीवरील पत्रे वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले आहे. शिवडाव चिंचाळवाडी येथे जगन्नाथ शिरसाठ यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. कळसुली उल्हासनगर, बौद्धवाडी येथे वीज वाहिन्या आणि वीज खांब जमिनीवर कोसळले. या दरम्यान त्याठिकाणी वावर नसल्याने होणारी जीवितहानी टळली. मात्र संबंधीत विभागाकडे याकडे वारंवार या पोल संदर्भात लक्ष वेधून देखील जाणीवपूर्वक याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
त्याचप्रमाणे साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांच्या घराच्या मागील पडवी व गोठ्यावर चिंचेच्या झाडाची फांदी कोसळून घराचे व गोठ्याचे नुकसान झाले. यावेळी श्री. घाडी हे घरात होते. मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. हरकुळ बुद्रुक येथे विद्युत विजेचे साधारणपणे ८० पोल कोसळून पडले आहेत. तर सुमारे १५ पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी पावसाने दाणादाण उडवल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नुकसान भरपाईकरिता पंचयादी करून नुकसान भरपाईकरिता प्रस्ताव करणे यासारख्या कामांमुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. गुरुवारी उशिरापर्यंत पंचयादी करण्याचे काम सुरू होते.