21.2 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली विभागामार्फत १०,००० झाडे लावण्याचा संकल्प !

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपक्रम; अजयकुमार सर्वगोड यांची माहिती ; राजमुद्री येथील नर्सरीला दिली भेट

कणकवली | मयुर ठाकूर : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आंध्रप्रदेशातील राजमुद्री येथिल नर्सरीपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली विभागामार्फत १०,००० झाडे लावून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प आम्ही केला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.

ते म्हणाले, राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम खात्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम खात्यात अप्पर मुख्य सचिव म्हणून मनिषा म्हैसकर या कार्यरत आहेत. त्या सुध्दा बांधकाम खात्याचा कारभार नियमबध्द आणि शिस्तबध्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.


सध्याच्या काळात पर्यावरणाचे रक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखो झाडे लावण्याच्या दृष्टीने मनीषा म्हैसकर प्रयत्नशील आहेत. त्‍यांनी बांधकाम खात्यातील सर्व विभाग प्रमुखांना आंध्रप्रदेश येथील राजमुद्री येथे जावून तेथील नर्सरी पाहून येण्याची सूचना केली. त्यानुसार माझ्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता छाया नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता ओटवणेकर, कनिष्ठ अभियंता तांबे अशा अधिकाऱ्यांनी राजमुद्री येथे असणार्‍या झाडांच्या नर्सरीला ११ मे रोजी भेट दिली.

त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राजमुद्री येथील नर्सरी पाहून सर्व अधिकारी भारावून गेले. आशिया खंडातील सर्वात मोठी नर्सरी त्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी नर्सरी तयार करण्याचा पिढयान -पिढ्यांचा व्यवसाय आहे. झाडांच्या विविध नर्सरी पाहून आपल्या परिसरात माझ्यासह सर्वच अधिकाऱ्यांना झाडे लावण्याचा मोह झाला. त्यामुळे मी आणि माझे सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता या वर्षी किमान १० हजार झाडे लावणार आहोत.तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

राजमुद्री येथील लोक मोठया प्रमाणात झाडे लावतात आणि जगवतात. ही बाब वाखाणण्या जोगी आहे. विशेष म्हणजे हजारो एकरावर या ठिकाणी नर्सरीमध्ये झाडे लावलेली आहेत. याठीकाणी सर्व प्रकारची झाडे ८ ते १० फुट उंचीची असून विक्रीसाठी अगदी नाम मात्र किमतीत उपलब्ध आहेत.तेथील लोकांचा आदर्श समोर ठेवून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्वांचे सहकार्य घेऊन कणकवली विभागातील सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात येईल. पुढील टप्प्यात इतर ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येईल.त्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे.असेही अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.

फोटो १.राजमुद्री येथील नर्सरीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
२.नर्सरीतील विविध प्रकारची झाडे पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!