कणकवली | मयुर ठाकूर : पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास तातडीने तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. तसेच सर्व अत्यावश्यक विभाग व यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. पुरस्थिती, घाटरस्त्यावर दरडी कोसळणे अशा समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाला कळविण्यासोबतच जबाबदारी दिलेल्या विभागांनी उपायोजनाही सुरू कराव्यात. या कालावधीत सर्व विभाग व यंत्रणांनी अलर्ट रहावे, असे आवाहन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
येथील तहसिलदार कार्यालयात श्री देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती के के प्रभु, लघु पाटबंधारेचे उपविभागिय अभियंता मंगेश माणगांवकर, संतोष शिरोडकर, महेश हिरेगोंडर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अतुल शिवणीवार, महावितरणचे उपविभागिय अभियंता विलास बगडे आगार व्यवस्थापक आ. द. गायकवाड तसेच इतर विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते
तहसिलदार कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून हा कक्ष १ जूनपासून सुरू असणार आहे. या कक्षाचा ९४२२७४६९०६ असा फोन नंबर असून काही समस्या निर्माण झाल्यास येथे तातडीने संपर्क साधावा. तसेच तहसिलदार कार्यालयातील सॅटेलाईट फोन यंत्रणासही सुसज्ज करण्यात आली आहे. फोंडाघाट व गगनबावडा घाटात दरड कोसळण्यासारख्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आपतकालीन यंत्रणा जेसीबीसहीत सतर्क ठेवावी. तसेच त्यांचे फोन नंबर प्रशासनाकडे द्यावेत, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या.
रस्त्यावर पडू शकणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्या कटींग करण्यात याव्यात. नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या धोकायवाय इमारतींचा तातडीने सर्व्हे करून त्यांना नोटीसा देण्यात याव्यात. पुराचे पाणी आल्यास यंत्रणेला कळविण्यासोबतच उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच धरणे, नदीच्या पाण्याच्या पातळीबाबत सतर्कतेच्या सूचना प्रशासनापर्यंत तातडीने पोहोचाव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले.