कणकवली : सध्या मे महिन्यातील सुट्टीचा हंगाम सुरु असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात येवू लागले आहेत. महामार्गाने गोव्याला जाणाऱ्या-येणाऱ्या पर्यटकांची, संख्याही वाढली आहे. याचाच फायदा घेत हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री सुरू झाली आहे. सध्या महामार्गावर काही अपवाद वगळता ठिकठिकाणी या कर्नाटकी आंब्यांचे स्टॉल लावल्याचे चित्र दिसत आहे. हापूसच्या नावामुळे पर्यटकही हा आंबा खरेदी करत असून हापूसपेक्षा कमी दराने तो मिळत असल्याने सिंधुदुर्गातील खऱ्या हापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसत आहे. मात्र, याची दखल ज्या यंत्रणेने गांभीर्याने घ्यायला हवी ती घेतली जात नसल्याने अशा विक्रेत्यांचे फावत आहे.
सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे. सिंधुदुर्गातील हापूस आंब्याचे दर ३५० रु. ते ७०० रु. पर्यंत डझन आहेत. अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्यात हापूस आंबा आलेला नाही. बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. मात्र त्यात कर्नाटकातील आंब्यांचीही घुसखोरी झाली आहे. विशेषतः महामार्गावर मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीसाठी ठेवलेला पाहायला मिळत आहे. देवगड हापूसच्या नावाखाली हे आंबे बॉक्समधून विकले जातात.
हापूस आंब्याच्या तुलनेत कर्नाटकातील आंब्यांचे दर ही काहीसे कमी आहेत. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार सिंधुदुर्ग पासिंगच्या काही गाड्यांमधून कर्नाटकचा आंबा सिंधुदुर्गात येतो. विशेष म्हणजे त्या बॉक्समधील पॅकिंगही स्थानिक पेपरच्या रद्दीचे असते. जेणेकरून ग्राहकांना तो इथलाच हापूस असावा अशी खात्री पटण्यासाठी ती व्यवस्था असते मात्र हापूसच्या नावाखाली कर्नाटकीय आंबा विकला जातो. हायवेवर काही अपवाद वगळता या कर्नाटकी आंब्यांचे स्टॉल लावलेले पाहायला मिळतात. पर्यटक आणि चाकरमानीही ते आंबे खरेदी करतात. हापूसच्याच डझनाचे किंवा पेटीचे दर सुरुवातील सांगितले जातात मात्र नंतर हे दर कमी केले जातात. त्यामुळे या आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्याचा फटका सिंधुदुर्गच्या हापूस आंब्याला बसत आहे.