सह्याद्रीमधील महत्त्वपूर्ण महामार्ग ; पर्यायी जमीन देणार
सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील महत्त्वपूर्ण अशा मानल्या जाणाऱ्या शिरशिंगे-शिवापूर मार्गाला भेडसावणाऱ्या वनजमिनीचा प्रश्न निकाली निघाला असून या मार्गाला अखेर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. तसे पत्र ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले असून हा महामार्ग सावंतवाडी व कुडाळ या दोन तालुक्यांना जोडला जाणार आहे.
सहयाद्री पट्टयातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या शिरशिंगे गावातून कुडाळ तालुक्यातील शिवापूर या गावाला जोडल्या जाणाऱ्या शिवापूर-शिरशिंगे रस्त्याला वनविभागाचा अडथळा होता. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गेले कित्येक वर्ष बांधकाम विभाग प्रयत्नशील होते. बांधकामकडून वनविभागाकडे पत्र व्यवहार सुरू होते. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.
शिरशिंगे शिवापूर मार्गावर ३.७ किलोमीटरचा वनजमिनीचा प्रश्न होता. या जमिनीबाबत विविध स्तरावर पत्रव्यवहार झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाकडून या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून या रस्त्यासाठी विशेष मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन देण्यात यावी अशी अट घालण्यात आली आहे. तब्बल सत्तावीस अटीची पूर्तता करण्यात यावी असे निर्देश परवानगी देताना घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता सावंतवाडी व कुडळ व्या दोन तालुक्यांना जोडणारा शिरशिंगे-शिवापूर हा मार्ग होण्यास वनविभागाकडून हिरवा कंदील मिळाला असून आचारसंहितेनंतर पर्यायी जमिनीचे पैसे सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग भरणार आहे. आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
दोन तालुक्यातील संपर्क सुलभ होणार
सावंतवाडी व कुडाळ या सह्याद्रीमधील महामार्गाला परवानगी देण्यात आल्याने दोन तालुक्यातील संपर्क सुलभ होणार आहे. तसेच दळणवळणाच्या दृष्टीनेही हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेंद्र केणी यांना विचारले असता या शिरशिंगे-शिवापूर मार्गाला वनविभागाकडून परवानगी मिळाली मिळाल्याचे मान्य केले.