दहा वर्षांपूर्वी राजकीय दहशतवादविरोधात आवाज उठवणाऱ्या दिपक केसरकरांची दातखीळ बसली का ?
आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यामुळे श्रीधर नाईक खुन खटल्यातील प्रमुख आरोपीमार्फत त्यांच्या राहत्या घरी घुसून त्यांना धमकी देण्यात आली. पराभवाच्या भीतीने नारायण राणेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सुंभ जळला तरी पिळ जात नाही अशीच काहीशी त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील दहशतवादी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. दहा वर्षांपूर्वी दिपक केसरकरांनी याच राजकीय दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे असे जिल्ह्याला भासवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आता सावंतवाडीच्या माजी नागराध्यक्षांना त्याच दहशतवादी प्रवृत्तीनी धमकी दिल्यानंतर दिपक केसरकर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत का…?, असा खोचक प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ते जखमी अवस्थेत असतानाच त्यांच्या अंगावर इनोव्हा गाडी घालून त्यांना गाडीखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला पण सुदैवाने ते बचावले. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीसांनी कसून चौकशी केल्यानंतर आमदार नितेश राणे हेच या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत हे लक्षात आले. वर नमूद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर नितेश राणे चार दिवस तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. अशा प्रकारे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दहशतवादी अपप्रवृत्ती नेमक्या कोण आहेत, यावर शिक्कामोर्तब केलेले आहे.
१९९१ साली राजकीय दहशतीच्या या रक्तरंजित राजकारणाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीनंतर माझे काका कै. श्रीधर नाईक यांची धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या भर चौकात हत्या करण्यात आली. नरडवे चौकात रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या श्रीधर नाईकांचे ‘ह्या बरा न्हय हा… ह्या बरा न्हय…’ हे अखेरचे शब्द होते. राजकीय दहशतीचे रक्तरंजित राजकारण एका हसत्या-खेळत्या कुटुंबाला कशा प्रकारे नाहक वेदना देऊ शकते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. १९९१ साली श्रीधर नाईकांचा खून केल्यानंतरही या रक्तपिपासू प्रवृत्ती थांबल्या नाहीत. याच रक्तरंजित राजकारणाने २००२ साली सत्यविजय भिसेंचा बळी घेतला. रमेश गोवेकरांच्या अपहरणानंतर आपला रमेश परत घरी येईल या अपेक्षेने त्यांच्या कुटुंबीयांनी अहोरात्र त्यांची वाट बघितली पण त्यांचा रमेश कधी घरी परतलाच नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अंकुश राणे बळीचा बकरा बनले. कणकवलीत येथील एस.एम.हायस्कूलचे शिपाई रमेश मणचेकर यांनी आपली जमीन विकायला नकार देताच त्यांची सुद्धा हत्या करण्यात आली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राणे समर्थक उमेदवार रविद्र फाटकांचा पराभव झाल्यानंतर बाळा वळंजू यांचा मुंबईमध्ये आगीत भाजुन संशयास्पदरीत्या मृत्यु झाला आणि सुदन बांदिवडेकरांची कणकवलीच्या भर बाजारपेठेत मारेकऱ्यांनी तलवारी घेऊन पाठलाग करत बोटे छाटली. दहशतीच्या या राजकारणात अनेक संसार उद्ध्वस्त झाले, डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने अनेक बालके पोरकी झाली, अनेक बायकांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले आणि हातातील हिरवा चुडा फुटला. २००९ विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री याच दहशतवादी प्रवृत्तीनी माझा रात्रीच्या अंधारात चार गाड्या घेऊन पाठलाग केला होता आणि निवडणुकीच्या दिवशी माणगावमध्ये माझ्यावर रिव्होलर रोखली. तरी सुद्धा राजकारणातील या अपप्रवृत्तींविरोधात रस्त्यावर उतरून मी माझा संघर्ष सुरु ठेवला आहे.
दहशतवाद हा काही राजकारणापुरता मर्यादित नाही. कुडाळमध्ये राणेंच्या बजाज शोरुम समोर कुणी देसाई नावाचा व्यावसायिक होंडा शोरुम उघडुन व्यवसाय करू पाहतोय या रागातून त्याच्या शोरुमला रात्रीच्या अंधारात आग लावण्यात आली. विरोधकांची केस लढवली म्हणुन कणकवली येथील प्रतिष्ठित वकील ऍड उमेश सावंत यांची गाडी जाळण्यात आली. वेंगुर्ल्यात बाबू इनामदार नामक वृद्धाने या अपप्रवृत्ती विरोधात लिखाण केले म्हणून त्यांची धिंड काढण्यात आली. गोव्यात टोल द्यायच्या क्षुल्लक कारणावरून टोल नाका फोडण्यात आला. चिपळूण मधील संदीप सावंत नामक कार्यकर्त्याला अपहरण करून अंधेरीतील एका इमारतीमध्ये डांबून लाठ्या-काठ्या, लोखंडी सळ्यांनी त्याला अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तिसऱ्या मजल्यावर उलटे टांगून ठेवण्यात आले. मुंबईमध्ये खोलीत बंद केलेले असताना त्यांच्या बायकोचा वापर करण्याची धमकी देण्यात आली.
२०११ साली वेंगुर्ला निवडणुकीत विलास गावडे हे पक्षाचे काम करत नाहीत या रागातून नितेश राणे त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी ते बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या दारावर लाथा मारल्या. ही बातमी शहरात आगीसारखी पसरल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी नितेश राणेंना यांना जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्ष कार्यालयातच कोंडून ठेवले. त्या रागातून नारायण राणे जिल्ह्यातील सर्व समर्थकांना सोबत घेऊन नितेश राणेंची सुटका करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी राणे समर्थकांनी लाठया, काठ्या, तलवारी, सोडा बॉटल यांचा वापर करून ग्रामस्थांना व शिवसैनिकांना प्रचंड मारहाण केली. वेंगुर्ला राडा प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने राणे समर्थक संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे यांना दोषी पकडून सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली. तेरा वर्षापूर्वी वेंगुर्ला शहराने नगरपंचायत निवडणुकीत एकजूट दाखवून सर्वच्या सर्व जागांवर दहशतवादी अपप्रवृत्तीचा पराभव केला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षांना धमकी देऊन याच अपप्रवृत्ती सावंतवाडीसारख्या शांत व सुसंस्कृत शहरात रक्तरंजित राजकारणाचा नवा अध्याय सुरु करू पाहत आहेत. राजकीय दहशतवादाविरोधात सोंग घेणारे सावंतवाडीचे शांतीदूत दीपक केसरकर आता दहशतवादी अपप्रवृत्ती विरोधात हातमिळवणी करून त्यांच्यासोबत सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेला राजकीय दहशतवादाविरोधातील ही लढाई आता स्वतःच हाती घेऊन लढावी लागेल. खुज्या माणसांच्या सावल्या जेव्हा लांबू लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे. मात्र सुर्यास्त होऊ देणे आपल्यापैकी कुणालाच परवडणारे नाही. राजकारणातील या दहशतवादी अपप्रवृत्तीना उंबऱ्यातच रोखायचे असेल तर सावंतवाडीच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुज्ञ जनतेने दिनांक ७ मे रोजी मशाल चिन्हा समोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना विजयी करून शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवली पाहिजे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.