बांदा : “आफ्रिकेत जाऊन प्रचार करा” अशा आशयाचे लावलेले “ते” बॅनर ठाकरे शिवसेनेने नव्हे तर सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाच्या वतीने लावण्यात आले होते, असे स्पष्टीकरण शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिले आहे. दरम्यान केसरकर यांनी वारंवार काजू बागायतदार शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शिष्टमंडळाला भेटीसाठी, बैठकीसाठी बोलावून त्यांना तिष्ठत ठेवले. त्यामुळे त्यांनी नाहक त्यांनी दिशाभूल करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत “ते” बॅनर शेतकऱ्यांनी लावले नसून ठाकरे शिवसेनेकडून लावले असल्याचा संशय मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला होता. याला श्री. विलास सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
सावंत यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातही ज्या बॅनरची चर्चा सुरू आहे. ते बॅनर आमच्या शेतकरी संघटनेतीलच सजक ,क्रियाशील कार्यकर्त्यांनी लावलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या बॅनर मुळे तीच राजकीय मंडळी संभ्रमित झाली आहेत. ज्यांचं धोरण आणि कृती ही शेतकऱ्यांच्या भल्याच्या विरोधात आहे .या छोट्याशा बॅनर मधून अतिशय सुंदर संदेश सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना देण्यात आला आहे आणि हा नुसता ट्रेलर आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांना जी जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाही किंवा त्या प्रकारे गोवा शासनाप्रमाणे जीआर निघाले नाहीत तर विधानसभेला संपूर्ण सिनेमा दाखविला जाईल. या बॅनरची संपूर्ण जबाबदारी आमची शेतकरी संघटना घेत आहे. कारण ही शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तविकता आहे. काही लोकप्रतिनिधी नी आपल्या विरोधातील राजकीय पक्षांवर आरोप केला आहे त्यामध्ये कुठच्याही प्रकारची तथ्य नाही, असे विलास सावंत यांनी म्हटले आहे.
मंत्री दीपक केसरकरांनी काजू शेतकऱ्यांच्या बाबतीत जे विधान केलं आहे की शेतकऱ्यांची व कारखानदारांची मिटींग लावली त्यामध्ये कमीत कमी १२० रुपये दर ठरला, हे जरी सत्य असलं तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही कारखानदाराने दीपक केसरकरांना सांगितल्याप्रमाणे काजू खरेदी केली नाही. उलट काजूचं सॅम्पल बघायला नेऊन त्यामध्ये त्रुटी काढून ह्या काजू ११०-११२ रुपये प्रति किलो प्रमाणे देण्याची कारखानदारांनी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागातदार संघाने स्वतःच्या हिंमतीवर जिल्ह्याबाहेरील पुणे,नाशिक, आजरा, चंदगड, गोवा येथील कारखानदारांना सुमारे २३० टनाच्या आसपास काजू १२० रुपये प्रति किलो तर काही काजू बी १२५ ते १२८ दराने विकली गेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखानदारांनी मान. केसरकरांचा शब्द पाळला नाही, ही खरी शोकांतिका आहे.खरंतर शेतकरी संघटनेच्या त्या सभासदांचे खरोखर कौतुक केले पाहिजे की या लढ्यामध्ये दोन महिन्याहून अधिक काळ त्यांनी आपल्या काजू संघटनेसाठी ठेवल्या यामध्ये त्यांचं अतोनात नुकसानही झालं परंतु ते संघटनेच्या बाजूने ठाम उभे राहिले.आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून अनेक गोष्टी कशा या कालावधीत होणार नाही याचं प्रतिपादन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. परंतु याच दरम्यान ७ मेला गोव्याची लोकसभा निवडणूक असून सुद्धा गोव्यातील शेतकरी दुष्काळामुळे व जानेवारीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे होरपळला असल्याने गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजू दुष्काळ जाहीर करून त्यांना अनुदान देण्याची घोषणा याच कालावधीत केली आहे. याची दखल कृपया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने घेणे आवश्यक आहे, असे विलास सावंत यांनी सांगितले. खरे शेतकऱ्यांचे कैवारी गोवा मुख्यमंत्री होऊ शकतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अनेक सबबी व आचारसंहिता दाखवून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाते .
अनेकदा तर मंत्री महोदयांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांना पुरेसा वेळ न देता किंवा त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून न घेता तुमचं काम निश्चित केले जाईल असं नुसतं आश्वासन देऊन शिष्टमंडळाची बोळवण केली आहे, असे श्री. विलास सावंत यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिकटून असलेलं गोवा राज्याचे शासन काजू शेतकऱ्यांसाठी १७० रुपये हमीभाव देण्याच्या तयारीत आहे आणि इकडे किलोमागे दहा रुपये अनुदानाची भीक देऊन मोठं पुण्य कर्म केल्याचं भासवत आहे याचं वैशम्य वाटतं असे त्यांनी सांगितले.