ओरोस : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलून हवेत सोडून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यात ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या ठिकाणी हे एअर बलून हवेत सोडण्यात आले आहेत. या बलूनवर लोकशाहीचा खरा आधार मतदार, प्रत्येकाचे मत महत्त्वाचे, सर्वांचा सहभाग हा लोकशाहीचा पाया, अशा प्रकारची जनजागृतीपर वाक्ये लिहिण्यात आली आहेत. ओरोस येथे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे व जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत एअर बलून हवेत सोडण्यात आला. तर कुडाळ येथे विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सावंतवाडी येथे विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम व कणकवली विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या उपस्थितीत बलून हवेत सोडण्यात आले.