26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

२६ एप्रिल रोजी राजापुरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार -माजी आ. प्रमोद जठार

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वा. राजापुरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. १ मे रोजी कुडाळ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. ३ मे रोजी रत्नागिरी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजपचे रत्नगिरी-सिंधुदुर्गचे लोकसभा संपर्कप्रमुख प्रमोद जठार यांनी दिली.

मागील १० वर्षांत खासदार विनायक राऊत यांना या मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संधी असतानाही देखील त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप जठार यांनी केला. लोकसभा निवडणुकीत राणेंचा विजय निश्चित असून राऊतांचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. जठार बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपचे प्रसिद्ध प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.

जठार म्हणाले, राजापूर येथील सभेला उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, किरण सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, सर्व आजी-माजी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजय करण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ७ मे रोजी होणार्‍या मतदानदिवशी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करून राणेंना लोकसभेत पाठावावे, असे आवाहन त्यांनी केले.

रिफायनरी, सीवर्ल्ड प्रकल्पांना विनायक राऊतांनी विरोध केला. त्यामुळे हे प्रकल्प होऊ शकले नाही. हे प्रकल्प झाले असते तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळाला असता, तसे राऊतांनी होऊ दिले नाही, असा गंभीर आरोप जठार यांनी करताना मागील १० वर्षांत राऊतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले. परिणामी या जिल्ह्यात विकासाचा बॅकलॉग वाढत गेला असून राऊत निष्क्रीय खासदार आहेत. मोदी सरकारने विकासाची दारे उघडून दिली असतानाही मागील १० वर्षांत राऊतांनी विकासात्मक १० कामे देखील केली नाहीत, अशी टीका त्यांनी केले. या मतदारसंघातील २००० गावांमध्ये मी संपर्कप्रमुख म्हणून फिरलो असून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४ लाख तर रत्नागिरी जिल्ह्यातून ३.५ लाख मते मिळतील, असा दावा त्यांनी केला. राऊत हे नाॅन परफर्मिंग खाते असून जतनेने या निवडणुकीत हे खाते बंद करावे, असे आवाहन जठार यांनी करताना दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह अन्य विकासात्मक कामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे व स्वतः मार्गी लावली, असे त्यांनी सांगितले.

बॉक्स
कोकणच्या विकासासाठी राणेंना साथ
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी व किरण सामंत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. मात्र, वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही दोघांनी मनात किंतू परंतु मनात न ठेवता आम्ही नारायण राणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला तो केवळ कोकणाच्या विकासासाठी त्यांना साथ दिली अाहे. कारण कोकणाचा विकास करण्याची क्षमता भाजप व नारायण राणे यांच्यात आहे, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!