पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
कणकवली : शहरातील परबवाडी येथील नरेंद्र रामचंद्र सावंत यांच्या घरातील बेड मध्ये ठेवलेला सोन्याचा ऐवज लंपास झाला आहे. सावंत यांच्या घरात १८ एप्रिल ते २४ एप्रिल या दरम्यान ही चोरी झाली आहे. नव्याने खरेदी केलेला सोन्याचा दागिना बेडमधील कप्प्यात ठेवण्यासाठी सावंत गेले असता त्यांना तेथील सर्व दागिने लंपास झाल्याची बाब लक्षात आली. या चोरीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या चोरीमागे स्थानिकाचा हात असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे.
कणकवली तालुक्यात गेल्या पाच दिवसांत चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. परबवाडी येथील नरेंद्र सावंत यांनी घरामध्ये असलेल्या बेडच्या कप्प्यात १४ तोळ्याचे दागिने पिशवीत भरून ठेवले होते. यामध्ये ८ तोळ्याचे मंगळसूत्र, ४ तोळ्याचा हार, १३ ग्रॅमची चैन, अडीच ग्रॅमची अंगठी, ४ ग्रॅमचे कानामधील कुंडी आणि एक नथ या दागिन्यांचा समावेश होता. काल (ता.२४) सावंत यांनी एक नवीन दागिना आणला होता. हा दागिना बेडच्या कप्प्यामध्ये ठेवण्यासाठी गेले असता, त्यांना १४ तोळे दागिने असलेली पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिसांना तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. सावंत यांच्या घरातील दागिने लंपास करण्यामागे स्थानिकांचा हात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.