24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

मदतीला धावुना जाणारा देव ……. आमचे वाळके सर!

शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावचे मुख्याध्यापक कै. श्री. राजेश भालचंद्र वाळके 

बारावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली

१४ एप्रिल चा तो दिवस… मात्र खेड वरून आलेला वारा एक दु : खद बातमी सोबत घेऊन आला .. शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन … ही बातमी प्रत्येक ग्रुप मधून गावभर वाऱ्यासारखी पसरली. सरांना गणेश मूर्ती कलेची आवड होती. सर गणेश मूर्ती आणायला मुंबई ला गेलेले आणि तिथेच त्यांना मृत्यूने गाठले … आमचे वाळके सर आम्हाला सोडून गेलेत हे सत्य पचवणं फार अवघड होतं…

प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता. शक्यतो प्रत्येक शिक्षक काही विशेष कारणासाठी ओळखले जातात. मात्र सरांना प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी आठवत होता. कोणी म्हणत होतं माझी आई आजारी असताना सर आपल्या घरून मला डब्बा घेऊन येत … कोणी म्हणत होता सरांनी माझ्या बोर्डाच्या परीक्षेची फी स्वतः भरली होती … कोणाला सरांनी गणवेश घेऊन दिलेला … कोणाला आपल्या मुलाचे कपडे घालायला दिलेलेत … तर कोणाला नोकरीसाठी आर्थिक मदत केलेली … प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रसंगात मदतीला धावून गेलेला माझा देव…

आणि मी विचार करत होतो नक्की कोणत्या कारणासाठी आठवू माझ्या देवाला. माझ्यासाठी तर त्यांनी शिक्षकी पेशाची हद्दच पार केलेली….मी कुठून येतोय? … माझी आर्थिक कुवत काय आहे ? सर ज्या अपेक्षा माझ्याकडून करतायत त्या पेलवण्याइतका मी सक्षम नाहीय. हे दोघांनाही माहिती होतं… तरी पण ती व्यक्ती माझ्यासाठी धडपड करत होती… “आज जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या अमुक अमुक सरांना भेटलोय … आज या या साहेबांना भेटलोय … तुझ्याबद्दल सांगिलय … तू काळजी करायची नाही. मी उडी मार म्हटल्यावर उडी मारायची मी आहे खंबीर! ” हे माझ्या सरांचे शब्द … मात्र मी त्या शब्दांना वेळेत न्याय नाही देऊ शकलो… पण असा केवळ मी एकटाच नव्हतो. असे अनेक विद्यार्थी होते. ज्यांना हे सिद्ध करून दाखवायचं होतं कि, आम्ही तुमचे विदयार्थी आहोत … अनेकांनी ठाम ठरवलेलं होतं.. आपल्याला आयुष्यात काही करून दाखवायचं तर ते या व्यक्तीसाठी करायचंय … यशस्वी व्हायचंय तर आपल्या सरांसाठी व्हायचंय … असे अनेक विद्यार्थी होते. जे सरांनी त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षाचे ओझे खांद्यावर घेऊन ध्येय्याप्रत वाटचाल करत होते.

वाटेत भेटणाऱ्या माझ्यासारख्या मार्ग भरकटलेल्या विदयार्थ्याला मध्येच अडवून सर स्पष्ट शब्दात खडसावत.. आणि माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी मान खाली घालून सरांचं बोलण खात…. कारण कित्येक जणांसाठी ते केवळ शिक्षकच नव्हते, तर त्यांच्या पित्याच्या जागी होते. तो हक्क होता त्यांचा.

७ वी ते १० वी या तीन चार वर्षांच्या कालावधीत मी जवळपास ४० ते ४५ प्रमाणपत्रे मिळवली … जवळपास जवळपास तेवढ्याच ट्रॉफ्या … आणि बक्षीसाची रोख रक्कम माझ्या खात्यात जमा होतं होती … पण यासाठी मी एका रुपयाचाही खर्च केलेला नव्हता….आणि इथेही मी केवळ एकटाच नव्हतो … तर प्रत्येक स्पर्धेत सर किमान सात ते आठ विद्यार्थ्यांची टोळी सोबत घेऊनच फिरत .. आणि ही परंपरा होती जी सरांच्या कारकिर्दीत सुरु झालेली ती आजतागायत चालू होती … मग ती चित्रकला स्पर्धा असो, रांगोळी स्पर्धा असो वा हस्ताक्षर स्पर्धा असो. शिवडाव हायस्कुलची मुलं आणि त्यांचं प्रविण्य ठरलेलंच असायचं..

आज जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं हस्ताक्षर आवडलं तर हमखास विचारतात … तू शिवडाव हायस्कुलचा विद्यार्थी का ? तू वाळके सरांचा विद्यार्थी का ? … उत्तर नक्कीच ‘हो ‘ असेल. गलेलठ्ठ पगार असलेले शिक्षक जेव्हा रुपयाचा खर्च करताना विचार करतात तेव्हा प्रश्न पडतो कि एवढ्या मोठ्या पगाराचं हे नक्की करतात तरी काय ?? आणि आमचे सर विद्यार्थ्यावर जो आपल्या मुलावर खर्च करावा तसा खर्च करत … ते बघून प्रश्न पडायचा कि सरांना पगार नक्की आहे तरी किती ?? कित्येक विद्यार्थी सरांच्या घरी जेवले … सरांच्याच घरी झोपले … मी ही त्यातलाच एक.

कारण सरांना शिक्षकी पेशातलं चाकोरीबद्ध आयुष्य जगताच आलं नाही …. कोणाच्या घरात काय चाललंय हे सरांना माहिती असायचंच आणि माहिती नसलंच तर तो विद्यार्थी हक्काने सरांसमोर मन मोकळं करायचा … कारण सर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलासारखं जपत … समजावत … प्रसंगी तेवढ्याच हक्काने मार ही देत … मात्र शिस्तीच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच तडजोड मान्य करत नसत … कित्येक कोवळ्या बालपण्णांना त्यांनी चांगल वळण दिलं … कित्येकांना आपल्या मुलाप्रमाणे जपलं..

असाच एक प्रसंग आठवतो….

जेव्हा एक रांगोळी स्पर्धा करून रात्री उशिरा आम्ही घरी परतत होतो. सरांची ऍक्टिव्हा होती. आणि सर नुकतेच चालवायला शिकले होते. ते उन्हाळ्याचे दिवस होते. मात्र रात्री अचानक पाऊस सुरु झाला होता. सर आणि सरांच्या ऍक्टिव्हा वर मागे बसलेले. आम्ही शिवडावच्या गडनदी पुलावर येऊन पोचलो. नदीच पाणी तुंबवलेले होतं. आणि तेव्हाचा तो पूल ही अरुंद होता. आम्हाला ट्रिपल सीट पुलावरून घेऊन जाण्याची हिम्मत सरांना होईना. गाडीवरून आम्हाला उतरवलं गेलं. आणि सरांच्या गाडीपुढे आम्ही चालू लागलो. अर्ध्यावर पोहोचल्यावर आम्ही मागे वळून पाहिलं. त्या काळोख्या रात्री नदीच्या अरुंद पुलावरून भर पावसात भिजत आमचा देव. आम्हांला उजेड दाखवत पुढे येत होता. सगळे म्हणतात चांगली नोकरी होती. आत्ता तर मुख्याध्यापक होते. शरीर साथ देत नव्हतं. तब्येतीच्या तक्रारी चालूच होत्या. कशासाठी हवे होते हे उपदव्याप ? ही धावपळ ??
कसं समजावणार?? हट्टी होता देव माझा…

जे ठरवलं ते करूनच दाखवायचं. मग त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतील याचा कधी विचारच नाही केला. कारण शिक्षकी पेशातलं चाकोरीबद्ध आयुष्य त्यांना जगताच नाही आलं. कित्येकांसाठी काळोख्या रात्री… आयुष्याच्या अरुंद पुलावर स्वतः भिजत माझा देव उजेड दाखवत गेला. कित्येकांना सरांना भेटायचं होतं, मी यशस्वी झालोय हे सांगायचं होतं. कित्येक विद्यार्थी हे सांगण्यासाठी धडपड करत होते. ते विद्यार्थी स्वतःच्या मालकीच्या चार चाकीतून कित्येक मैलाचा प्रवास करून आले ही. पण ही वेळ मात्र चुकीची ठरली. सरांच्या पायांना त्यांनी स्पर्श केला. पण सर मात्र शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मारू शकले नाहीत…ही खंत कायम राहील. मात्र सरांनी आपल्या अपेक्षाचं गाठोडं जे प्रत्येकाला बांधून दिलं होतं…. ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा देत राहील.

– आपलाच विद्यार्थी 

शुभम पवार,शिवडाव

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!